धुळ्यात अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेचे माठ फोडो आंदोलन

धुळे, www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील नकाणे, डेडरगांव, हरणमाळ, अक्कलपाडा मध्यम प्रकल्प, तापी पाणी पुरवठा यात पाण्याचा गेल्या 2 महिन्यांपासून ओव्हरफ्लो सुरु आहे. पांझरा नदी गेल्या जुलै महिन्यांपासून दुथडी भरून वाहत असतांना महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती यांच्या बेजबाबदार प्रशासनामुळे नियोजनशुन्य अभावाने धुळेकरांना 10 ते 12 दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धुळेकरांच्या घशाला कोरड पडली आहे. असा आरोप करीत शिवसेनेने आज माठ फोडो आंदोलन केले.

धुळे महापालिकेच्या आवारात झालेल्या या आंदोलन प्रसंगी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली. धुळेकरांची सध्याची अवस्था धरण उशाशी, कोरड घशाशी अशी झाली आहे. धुळेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपाला प्रचंड बहुमतांनी मनपाची सत्ता दिली. तिथले लोकप्रतिनिधी, नगरसेवक केवळ विकास कामाच्या नावाखाली रस्ते, गटारी यांचे बिले काढण्यात व्यस्त आहेत. असा आरोप सेनेने केला आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी झोपेचे सोंग घेतले असून प्रशासनावरील वचक संपल्यामुळे महानगरपालिकेत अराजकता माजली आहे. त्याचा परिणाम धुळेकरांना सहन करावा लागत असून अनियमित पाणीपुरवठ्यामुळे धुळेकर पुरते बेजार झाले आहेत. धुळे शहरात तापी योजना व हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्र येथील पंपींग स्टेशनवरील पंप खराब झाले असून सद्यस्थितीत दोनच पंप कार्यान्वीत आहे. अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. शहरातील नगावबारी, रामनगर, मायक्रोव्हेव, मधुबापू माळी, अशोक नगर, मोहाडी, मनमाड जीन, चक्करबर्डी, चितोड रोड जलकुंभ पुरेशा प्रमाणात भरलेच जात नसून 10 ते 12 दिवसाआड येणारे पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.

136 कोटींची पाणी पुरवठा योजना मनपाच्या भाजपा सत्ताधाऱ्यांनी बासनात गुंडाळली आहे. या पाणीपुरवठा योजनाच्या माध्यमातून शहरात अनेक ठिकाण नव्याने जलकुंभाची निर्मिती करण्यात आली. पण या जलकुंभात पाण्याचा एकही थेंब गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला नाही. परिणामी मनमाड जीन येथील नवीन जलकुंभाच्या मध्यभागातील स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आहे. एकीकडे दररोज पाणीपुरवठा करू, अशी घोषणा करणारे 10 ते 12 दिवसाआड येणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर मुग गिळून बसले आहेत. केवळ अकार्यक्षम नियोजनामुळे धुळेकर बेहाल आहेत. एकंदरीतच महापालिका सत्ताधाऱ्यांना धुळेकरांचे प्रश्न सोडविणाऱ्यावर अपयश आलेले आहे. धुळेकरांना पाच दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा करा, अशी आर्त हाक सत्ताधाऱ्यांकडे करावी लागत आहे.

याविरोधात शिवसेनेने मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपाचा निषेध करीत आज मनपात रिकामे माठ फोडो आंदोलन केले. येत्या 5 दिवसांत सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, चंद्रकांत गुरव, महिला संघटीका हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, रवि माळी, विनोद जगताप, सुनिल पाटील, जवाहर पाटील, उपमहानगरप्रमुख शेखर वाघ, रफिक पठाण, मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रविण साळवे उपस्थित होते.

हेही वाचा ;

The post धुळ्यात अनियमित पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेचे माठ फोडो आंदोलन appeared first on पुढारी.