‘धुळ्यात आमदार फारूक शाह यांच्याविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन’

धुळे आंदोलन,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात रस्ते विकासाच्या कामांना स्थगिती दिल्याच्या कारणावरून एम. आय. एम चे आमदार फारुख शाह यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा ने निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला रोष व्यक्त केला.

धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या या आंदोलनात भाजपाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर प्रदीप करपे, स्थायी समिती सभापती शितलकुमार नवले, यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी, महिला बालकल्याण सभापती योगिता बागुल, उपसभापती आरती पवार, ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेविका सुरेखा ओगले, डॉ. माधुरी बाफना आदी सहभागी होते.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले की, आमदार शाह हे रस्त्याच्या कामासंदर्भात चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार शहा यांनी देवपुरातील रस्त्यांसाठी 30 कोटीची मागणी केली. शासनाने त्यांना मंजुरी देखील दिली. मात्र यातील बहुसंख्य कामे देवपूर परिसरात न करता अल्पसंख्यांक विभागात करण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवपुरातील रस्त्यांच्या कामासाठी पैशांची मागणी करण्यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. यावेळी यापूर्वीच 30 कोटी रुपये देवपूरच्या रस्त्यांसाठी दिल्याची बाब उघड झाली. या यादीमध्ये 80 टक्के कामे केवळ अल्पसंख्यांक विभागातील होती. विकासाचे काम केवळ एका विशिष्ट भागातच करणे हा एक प्रकारचा जातीयवाद नाही तर काय आहे असा प्रश्न अग्रवाल यांनी उपस्थित केला. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने ताबडतोब कामे रद्द केली. त्याचप्रमाणे आता नव्याने 30 कोटीची कामे शासनाला सुचवण्यात आली असून ही सर्व कामे देवपूर विभागातील आहे. आमदार शाह यांनी या रस्त्यांची कामे यांच्या मोबदल्यात ठेकेदारांकडून कमिशन घेतले असावे असा संशय देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. आमदार हे धुळे शहरात चार वर्षात 400 कोटीची कामे केल्याचे दाखवत आहेत. त्यांनी या कामांची यादी प्रसिद्ध करावी, असे खुले आव्हान देखील यावेळी त्यांना देण्यात आले.

हेही वाचा :

The post 'धुळ्यात आमदार फारूक शाह यांच्याविरोधात भाजप महिला आघाडीचे आंदोलन' appeared first on पुढारी.