धुळ्यात गुटखा तस्करीसाठी पुन्हा आराम बसचा वापर

आरामबस गुटखा तस्करी www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मध्यप्रदेशातून शिर्डीकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेल्या गुटख्याच्या तस्करीसाठी आराम बसचा वापर करण्यात आल्याचा प्रकार पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन बालकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरून गुटख्याच्या तस्करीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार मुंबई आग्रा महामार्गावर सापळा लावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची एम पी 30 पी 2313 क्रमांकाची आराम बस या पथकाने थांबवली. या वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला विमल राजनिवास, रजनीगंधा तसेच अन्य गुटख्याचा साठा आढळून आला. सदर गुटखा इंदोर वरून शिर्डी येथे जाणार असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. वाहनचालक गोपाळ रामसिंग यादव तसेच सहचालक वासिम कुतुबल अन्सारी तसेच क्लिनर कमलेश दिलीप बागेल या तिघांची चौकशी सुरू केली. यात वाहनामध्ये बसलेल्या एका अल्पवयीन मुलाने हा साठा आणल्याचे निदर्शनास आले. या विधी संघर्षग्रस्त बालकाने सहा गोण्यांमध्ये सुमारे दोन लाखाचा गुटखा तस्करीचा प्रयत्न केल्याची बाब निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या आराम बस मध्ये 30 प्रवासी असल्याने आरंमबसच्या मालकाशी संपर्क करून या सर्व प्रवाशांना दुसऱ्या गाडीमधून शिर्डी येथे पोहोच करण्याची व्यवस्था पोलिसांनी करून दिली. यानंतर गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेली आराम बस देखील जप्त करण्यात आली. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post धुळ्यात गुटखा तस्करीसाठी पुन्हा आराम बसचा वापर appeared first on पुढारी.