Site icon

धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. या संदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंदिराच्या आवारात भजन आंदोलन करण्यात आले असून या आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी दिले आहे.

धुळे शहरातील मोगलाई परिसरात असणाऱ्या एका धार्मिक स्थळात आज सकाळी एक महिला दर्शनासाठी गेली असता तिला मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. तिने हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितल्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी गोळा झाली. दरम्यान पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. मंदिर परिसरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भजन आंदोलन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैंद, भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे तसेच राजेंद्र खंडेलवाल, भरत देवळे, यांच्यासह अनेकांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी अन्यथा शहरांमध्ये निषेध आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान दुपारपर्यंत संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचे काम सुरू होते. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले की, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संबंधितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मात्र नागरिकांनी संयम राखावा. कोणत्याही अफवेला बळी पडू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन यावेळेस बारकुंड यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव appeared first on पुढारी.

Exit mobile version