Site icon

धुळ्यात ब्राह्मण संघाने ‘प्रि वेडींग’ प्रथा केली बंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाच्या सर्व साधारण सभेत ‘प्री वेडिंग शुट’वर बंदी घालण्याचा ठराव मांडला. सर्व सहमतीने हा ठराव पारीत करण्यात आला.

मनकर्णीका भवन येथे ही सभा पार पडली. यावेळी २०२३ ते २०२८ नवीन कार्यकारणी निवड, लव जिहाद, प्री वेडिंग अशा विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये ब्राह्मण संघाचे अध्यक्ष महेश मुळे यांनी प्री वेडिंग शुटींगवर बंदी घालण्याचा ठराव मांडला. सर्व सहमतीने ही ठराव पास करण्यात आला.

यावेळी महेश मुळे यांनी मत मांडले. काळाच्या कसोटीवर व्यवहार्य व उचित न ठरणाऱ्या सामाजिक कुप्रथा एकीकडे बंद केल्या जात असताना दुसरीकडे संपन्नतेच्या प्रदर्शनासाठी नव्या आणि नैतिकतेला उध्वस्त करणाऱ्या प्रथा सुरू आहेत. तेव्हा यातून समाजाची अधोगतीच घडून आल्याखेरीज राहणार नाही. नात्याच्या पवित्रतेवर ओरखडा उमटवू पाहणाऱ्या व मर्यादांची सीमा ओलांडणा-या ‘प्री- वेडिंग शूट’मुळे अनेक अप्रिय घटनांमुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर विवाह व्यवस्था आणि त्यातील मान्यतांनाही आता हादरे बसू लागले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी व संस्थांनीही याबाबत वेळीच सावध होऊन भूमिका घेणे म्हणूनच गरजेचे बनले आहे. हौसेला मोल नाही पण आपले वैयक्तिक आयुष्य याद्वारे इतरांसाठी किती खुलं करावं यात सामाजिक भान असावं. ऐश्वर्याचे व संपन्नतेचे प्रदर्शन मांडू पाहणाऱ्या घटकांकडून हे फॅड पुढे आणले गेले आहे. पण आपणही ते केले नाही तर समाजात आपली गणना मागास म्हणून होईल, असा समज करून घेतलेला वर्गही नाईलाजाने हे फॅड स्वीकारताना दिसतो आहे. यातून संस्कृती-संस्कारांना व नैतिकता- मर्यादांनाही गालबोट लागू होत असल्याने यासंदर्भात काही घटना सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणा-या आहेत. काही लग्न मोडले, काही ठिकाणी ब्लॅक मेलींगचे प्रकार सुरू आहेत. यातून मुलींना व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुढारलेपणाच्या प्रदर्शनातून आपण नैतिकतेला कसे धाब्यावर बसवतो आहोत. वधू-वर किंवा त्यांच्या कुटुंबीयांची आवड, हौस बाजूस ठेवून विचार करता या नव्या प्रथेची समाजाला म्हणून खरेच काही गरज आहे का..? असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यानंतर एक मुखाने सर्व समाज बांधवांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष महेश मुळे, नव निर्वाचित अध्यक्ष अॅड रामकृष्ण जोशी, माजी अध्यक्ष सुभाष दिक्षीत , माजी अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी , उपाध्यक्ष प्रा लक्ष्मीकांत जोशी,  जया जोशी, विजय पाठक, प्रा.धर्मेद्र पाठक, रघुनाथ पाठक, मेघश्याम दिक्षीत, रमेश जोशी, देवेंद्र पाठक, विजय भट, चेतन जोशी, पुंडलिक चंद्रात्रे, संजय दिक्षीत, राजेश कुलकर्णी, माधवी गोरे, कल्पना जोशी इत्यादी कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.

The post धुळ्यात ब्राह्मण संघाने 'प्रि वेडींग' प्रथा केली बंद appeared first on पुढारी.

Exit mobile version