धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्य सरकार विरोधात निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनी शिक्षकांच्या अश्वासित व न्याय मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणी राज्य सरकारकडून न झाल्याने काळ्या फिती लावून निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भूमिका महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे धुळे महानगराचे सचिव सागर चौधरी यांनी मांडली आहे.

शिक्षक दिनानिमित्त सर्वत्र शिक्षकांचा गौरव होत असताना, धुळ्याच्या जय हिंद कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याची भावना व्यक्त करून राज्य शासन तसेच शिक्षण प्रशासनाचा विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या आदेशानुसार जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात सर्व शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकार आणि प्रशासनाने आश्वासन न पाळल्याने निषेधार्थ राज्य सरकारचा आणि शिक्षण विभाग प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध केला. शिक्षण प्रशासन आणि राज्यातील शासन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शासनाने शिक्षण सेवक योजना तातडीने रद्द करावी, कला शाखेत कमीत कमी 20 विद्यार्थी संख्या मान्य करून जोपर्यंत कार्यभार शून्य होत नाही तोपर्यंत शिक्षकास अतिरिक्त ठरवू नये तसेच अकरावी ऑनलाइन प्रक्रियेत सुधारणा करावी ,अर्धवेळ शिक्षकांना प्रचलित पद्धतीनुसार रोस्टर प्रमाणे पूर्णवेळ पदावर नियुक्त करण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संजय देवरे ,राज्य आयटी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा अतुल पाटील ,धुळे महानगर सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना प्रा सागर चौधरी,जेष्ठ प्राध्यापक बी ए देवरे ,प्रा एन बी पाटील ,प्रा बिपीन सोनवणे ,प्रा जयेश कोर,प्रा एल पी काळे, प्रा वाय एस सोनवणे ,प्रा सौ हेमलता ठाकरे,प्रा सौ मनीषा बच्छाव ,प्रा सौ निलक्षी पाटील,शिक्षकेतर कर्मचारी प्रफुल्ल सूर्यवंशी यांच्यासह या आंदोलनात शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा

The post धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षकांचे राज्य सरकार विरोधात निदर्शने appeared first on पुढारी.