धुळ्यात रक्तदान करत तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत

रक्तदान www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

देशातील तरुणांसमोर अनेक आव्हाने असताना धुळ्यातील युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेने नववर्षाचे स्वागत रक्तदान शिबिर घेऊन केले. गेल्या 39 वर्षांपासून ही चळवळ नित्यनियमाने या तरुणाईने सुरू ठेवली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून तरुणांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून सामाजिक कामांना हातभार लावून उत्सव साजरे केले पाहिजेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.

धुळे येथे युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेतर्फे दरवर्षी सरत्या वर्षाला निराेप देताना 31 डिसेंबरच्या मध्यरात्री युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. नववर्षाचे स्वागत करण्याची वैभवशाली परंपरेचे पालन करत 39 वर्षे सातत्याने उपक्रम चालू ठेवला आहे. त्याप्रमाणे यंदा देखील नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रक्तदान शिबिर उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले. आग्रा-रोडच्या श्रीराम मंदिरासमोर ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, ॲड. महेंद्र भावसार, प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ साहित्यिक जगदीश देवपूरकर, अरविंद चौधरी, उद्योजक सारांश भावसार, पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, पोलिस निरीक्षक धीरज महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीरप्रसंगी संजय बारकुंड म्हणाले की, स्वतःवर एखादे संकट ओढवते, तेव्हा त्या घटनेचे आणि रक्तदानाची किंमत कळते. ही अनुभुती माणसाला जगणे शिकवते. देशात अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. युवकांमधील व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय असताना सामाजिक भान म्हणून रक्तदानासाठीच्या चळवळीत तरुण सहभागी होत आहेत. हे एक आशादायी चित्र आहे. युवकांनी या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होऊन चळवळी जिवंत ठेवाव्या अशी अपेक्षा आहे.

नववर्षाचे स्वागत मध्यरात्री रक्तदानाने करावे’ या युवक बिरादरीच्या अनोख्या संकल्पने संदर्भात झालेल्या घडामोडींवर प्रा. शरद पाटील आणि ॲड. महेंद्र भावसार यांनी प्रकाशझोत टाकला. रक्तदान कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये के. डी. शर्मा, विनोद शर्मा, हिलाल माळी, डॉक्टर शरद भामरे, वंदे मातरम मित्रमंडळाचे डॉक्टर संदीप पाटील, श्याम बोरसे, सुनील पाटील, संत निरंकारी सत्संग मंडळ, खुनी गणपती मित्र मंडळ, प्रकाश बाविस्कर, ॲड. पंकज गोरे, कोहिनूर क्लबचे सलीम टंकी आदींचा सत्कार करण्यात आला. मध्यरात्री उशिरापर्यंत शेकडो तरुण तरुणींनी रक्तदान करून नववर्षाचे स्वागत केले. जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक सारांश भावसार, देवेन शेळके, सुभाष शिंदे, प्रा. रवींद्र पाटील, सुनील पाटील, दिलीप साळुंके, सुरेश चत्रे, पुष्कराज शिंदे, अमृत पवार, कैलास कारंजेकर, रमेश निकम, युवराज गिरासे, अरुण पाटील, किरण दुसाने, रणजीत शिंदे, जितेंद्र पगारे, चंदू कुंभार, प्रकाश बाविस्कर, राजेंद्र घोगरे, एडवोकेट योगेश अग्रवाल, पी डी पाटील, विनोद शर्मा, किशोर बारी, कमर शेख, जावेद देशमुख यांसह अनेक कार्यकर्त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

हेही वाचा:

The post धुळ्यात रक्तदान करत तरुणाईने केले नववर्षाचे स्वागत appeared first on पुढारी.