धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन

पथसंचलन www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकाळी पथसंचलन केले. तर पोलीस प्रशासनाने शस्त्रपूजन केले. शहरात तीन ठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीत विजया दशमीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. हा सण मोठ्या पारंपारिक उत्साहात साजरा करण्यात येत असून सकाळपासूनच घरावर तोरणे लावण्यासाठी अबालवृद्धांची लगबग सुरू होती. यावेळी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. व्यापाऱ्यांनी देखील दुकानांसमोर आकर्षक रांगोळया रेखाटल्या. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस मुख्यालयात शस्त्रपूजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या हातून शस्त्रपूजन करून विजयादशमीचा आणंद व्दिगुणीत करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही पथसंचलन उत्साहात झाले. छत्रपति शिवाजी महाराज पुतळा, प्रकाश टॉकीज, पारोळा रोड येथून संघ प्रार्थना करुन घोषवादकसह पथसंचलनास सुरुवात झाली. पवनपुत्र ग. नं. ६ मार्गे तुकाराम विजय व्यायमशाळावरून माधवपुरा, रामभाऊ दाढीवाला खुंटमार्गे राजकमल सिनेमामार्गे आग्रारोडने संघ स्थान अर्थात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पथ संचलनाचा समारोप झाला. तसेच संचलन ज्या मार्गावरून प्रस्थान होत होते. त्या ठिकाणी परिसरातील रहिवाशांनी फुलांची वृष्टी तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत जयघोषात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे स्वागत केले. या पथ संंचालनात धुळ्यातील प्रसिद्ध हदयरोग तज्ज्ञ प्रांजल पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पथसंचलन संघ घोषवादकसह अनेक बाल स्वयंसेवक, तसेच तरुण, प्रौढ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथे होणार रावणदहन…

शहरातील तीन ठिकाणी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीत बहावलपुरी समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी 42 फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली. याशिवाय मोहाडी आणि चितोडरोड या ठिकाणी देखील रावण दहनाचे आयोजन करण्यात आले असल्याने तीनही कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

हेही वाचा:

The post धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलीस प्रशासनाने केले शस्त्रपूजन appeared first on पुढारी.