धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात शिवसैनिक आक्रमक

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रमुख मागणीसाठी आज शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला घेराव घातला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि गुजरातच्या ठेकेदाराला पाठबळ देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत असून हा रस्ता पंधरा दिवसात दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

धुळे शहरातून देवपूर परिसराला जोडणारा तसेच मध्य प्रदेश, नंदुरबार आणि शिरपूर शहराकडे जाणाऱ्या जुना आग्रा रस्त्यावर भुयारी गटारीची योजना दोन वर्षांपासून राबवणे सुरू होते. या योजनेचे काम संपल्यानंतर अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने शिवसेनेने यापूर्वी अनेक वेळेस निवेदने दिली. मात्र आज जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील व डॉक्टर सुशील महाजन तसेच ललित माळी, भरत मोरे, विनोद जगताप, कैलास पाटील आदींनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता नवले यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करीत त्यांना धारेवर धरले.

या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने वेगवेगळया अपघातात तीन तरुणांना प्राण गमवावे लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून भुयारी गटारी योजना राबवण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करणे क्रमप्राप्त असताना रस्त्याची अद्यापही दुरुस्ती केली गेली नाही. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम देखील मूग घेऊन असल्याची टीका यावेळी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग गुजरातचा ठेकेदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराला पांघरून घालत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला. यावेळी अभियंता नवले यांनी रस्त्याच्या कामाला दिरंगाई होत असल्याचे मान्य केले. मात्र शासन स्तरावरून वेगळाच प्रस्ताव मंजूर झाला असून या मंजूर निधीचा वापर देवपुरातील रस्ता दुरुस्तीकडे वळविण्यासाठीचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला जाणार असल्याचे सांगितले. मात्र शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यांनी पंधरा दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

The post धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाविरोधात शिवसैनिक आक्रमक appeared first on पुढारी.