धुळ्यात हिट अँड रन प्रकरणातील चालकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर

हिट अँड रन www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मद्य धुंद अवस्थेत टँकर चालवून अनेक वाहनांना धडक देणाऱ्या वाहनचालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुळ्यात रात्री उशिरापर्यंत या मद्यपी चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून अनेकांची झोप उडवली होती.

गुजरात राज्यातून येणारे वाहन येथील वळण रस्त्याने थेट मुंबई आग्रा महामार्गाला जातात. या मार्गावरुन टँकर (जी जे 16 ए यु 51 75 ) हा नागपूर सुरत महामार्गावरून सरळ धुळे शहरात आला. या टँकर चालकाने भरधाव वाहन शहरात आणले. यावेळी जुन्या जिल्हा रुग्णालयाजवळ ओमनी (एम एच 19 ए इ 68 33) वाहनाला धडक दिली. या अपघातात प्रकाश मुलानी हे जखमी झाले. यानंतर ट्रंकरने संतोषी माता चौक ते फाशी पूल चौकाच्या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ रिक्षाला (एम एच 18 बी एच 0134) धडक दिली. यात रिक्षाचालक विश्वजीत कारभारे हे जखमी झाले आहेत. याच रस्त्यावर पोलीस वसाहतीजवळ या टँकरने दुचाकीला धडक दिली. या घटनेमुळे रस्त्यावर नागरिकांमध्ये धावपळ झाली. टँकर चालकाला पाठलाग करून त्वरीत पकडण्यात आले आहे. संतप्त जमावाने वाहनचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता शिवचरण काशिनाथ गोते असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. या चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये हिट अँड रन चा हा प्रकार केल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चालकाच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून चालकाला जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा:

The post धुळ्यात हिट अँड रन प्रकरणातील चालकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर appeared first on पुढारी.