ध्येय निश्चित करुन तपश्चर्या केल्यास यश हमखास : लेप्टनंट सुरज चौधरी

देवळाली कॅम्प, प्रतिनिधी

कोणताही माणुस सामान्य किंवा असामान्य नसतो, त्याचे यश मिळविण्यासाठी तो स्वताच प्रयत्न करत असतो. त्याकरीता व्यक्तीला स्वताचे ध्येय निश्चित करावे लागते. ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम अन तपश्चर्या करावी लागते, असे ध्येय निश्चित करुन तपश्चर्या केल्यावर कोणत्याही व्यक्तीला यश हमखास मिळते, असे प्रतिपादन लेप्टनंट सुरज नामेदव चौधरी यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी दि. १२ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज नामदेव चौधरी यांची लेप्टनंट पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार समारंभ विद्यार्थी संवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना लेप्टनंट सुरज चौधरी बोलत होते.

व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे, सरचिटणीस गजीराम मुठाळ, प्रशांत दिवंधे, उपप्राचार्य डॉ. सोपान एरंडे, उपप्राचार्य दिलीप जाधव, एन. के. सोनवणे, सुधाकर जाधव, माणिक गोडसे आदी होते. लेप्टनंट सुरज चौधरी पुढे म्हणाले की, भारतीय लष्कर व्यवस्थेत अनेक पदांची सेवासंधी उपलब्ध आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीपासूनच प्रयन्त करावेत. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे प्रास्ताविकात म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थी सुरज चौधरी याने स्वताची चिकाटी तसेच पदासाठी योग्य असणारी मेहनत विद्यार्थी दशेपासून घेतली. त्यामुळे आज तो यशस्वी होऊ शकला आहे. हाच आदर्श विद्यार्थ्यांनी डोळयासमोर ठेवून स्वताला आकार द्यायला हवा.

लेप्टनंट सुरज चौधरी यांची उपप्राचार्य डॉ. सोपान एरंडे यांनी प्रकट मुलाखत घेतली. यात सुरजच्या जडणघडणीवर प्रकाशझोत टाकला. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असतांना लेप्टनंट सुरज चौधरी यांना अनेक विद्यार्थ्यांनी लष्करी पदभरती, पुर्वतयारी, मुलाखत यासारख्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले. त्याला लेप्टनंट चौधरी यांनी सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. पुरुषोत्तम गांगुर्डे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post ध्येय निश्चित करुन तपश्चर्या केल्यास यश हमखास : लेप्टनंट सुरज चौधरी appeared first on पुढारी.