नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

केळीबाग ,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

खानदेशात आलेली उष्णतेची लाट माणसांना असह्य झाली आहे, तितकीच ती पिकांना देखील हानिकारक ठरत आहे. या तीव्र उष्णतापमानात केळीचे घड टिकाव धरेनासे होऊन जमिनीवर धडाधड कोसळून पडत असल्याची एक निराळी समस्या सध्या केळी उत्पादकांच्या मुळावर उठली आहे. ऐन काढणीच्या हंगामात रोज टन अर्धा टन वजनाची केळी झाडे व घड पडल्याचे पाहावे लागत असल्यामुळे केळी उत्पादक पूर्ण धास्तावले आहेत.

हा प्रकार शहादा तालुक्यातील म्हसावद आणि परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शनास आला. शहादा तालुक्यातील हा परिसर केळी उत्पादनात अग्रेसर असून प्रामुख्याने या भागात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विद्यमान स्थितीत या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली केळी काढणीच्या स्थितीत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाशी घास आलेला असतानाच सद्या प्रचंड तापमान वाढले आहे. आठवडाभरापासून 43 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असून अति उष्ण वारे वाहत आहेत.  परिणामी काढणीला आलेली केळी धोक्यात आली आहे. सतत वाढणाऱ्या तापमानाचा चटका केळीच्या बागांना बसत असून ऐन हंगामात हाती आलेली केळी उध्वस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. उष्ण हवेचा फटका शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी आणत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी वादळ वा-यात केळीसह पपई, हरहरा, मूग, मका याचे नुकसान झाले. तो अवकाळी फटका शेतकऱ्यांनी नुकताच झेलला. त्या पाठोपाठ आता हे वाढत्या तापमान केळी बागांच्या मुळावर उठला आहे. हे संकट झेलणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की,
वाढत्या तापमानामुळे आणि उष्ण  हवेमुळे केळीचे झाड पडण्याचे प्रकार वाढले आहेत. केळी घड झाडापासून तुटून पडताहेत. दिवसा दहा पंधरा केळीची झाडे पडतात, तर रात्री पुन्हा पंधरा वीस झाडे केळी घडासह जमिनीवर पडलेले दिसतात. संकटग्रस्त शेतकऱ्यांची यातली मूळ समस्या अशी की, जमिनीवर पडलेले सुमारे तीस ते पस्तीस कीलोचे हिरवेगार केळीचे घड व्यापारीसुद्धा खरेदी करीत नाही. ते वाया गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होते. बारा महिने तळहाताच्या फोडासारखी काळजी घेऊन वाढविलेली बाग अशी उध्वस्त होतांना पाहून शेतकरी मनातून उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. रोप,लागवड, मशागत, खते, मजुरी इत्यादीवर लाखो रुपये खर्च करुन वाढविलेल्या बागेचा सांभाळ करावा कसा? अशा बिकट प्रश्नांच्या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे.

दरम्यान, अस्मानी सुलतानी संकटात होरपळून कसाबसा जीव मुठीत धरुन उभा असलेल्या शेतक-याला आर्थिक मदत मिळावी. शासनाने जळगाव जिल्ह्यायातील शेतक-यांना दिलेल्या मदतीच्या धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही त्वरीत वीस हजार रुपये एकरी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकरी पुष्पा पुरुषोत्तम पटेल, लिमजी रामदास पाटील, सुजित लिमजी पाटील, पुरुषोत्तम यादव पाटील, किशोर सोमजी पाटील, शेख अंजुम शेख, इक्बाल तेली, योगेश बाबु पाटील, अनिल मुरलीधर पटेल, विठ्ठल यादव पाटील, भगवान पुरुषोत्तम चौधरी यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त..  appeared first on पुढारी.