नंदुरबार : अधीक्षकांनी पारंपरिक वाद्याचे आवाहन करताच 13 डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने जमा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
डी. जे. व डॉल्बी असोसिएशनच्या पुढाकाराने नंदुरबार शहरातील 13 डी. जे. व डॉल्बी सिस्टिम ही स्वेच्छेने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे जमा केले आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी, मोहरम, विश्व आदिवासी गौरवदिन तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे. असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांनी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त केला. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यामुळे डी. जे. व डॉल्बीमुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून राज्यात नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना तसेच विसर्जन मिरवणुक वेळी ध्वनी प्रदुषण निर्माण होईल. अशी साधने डी. जे. व डॉल्बी यांचा वापर करण्यावर ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण व नियमन तसेच सण व उत्सव साजरे करतांना डी. जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदुषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी. जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम, आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी गणेश विसर्जनापर्यंत डी. जे. व डॉल्बी सिस्टिमवर बंदी घातली आहे. त्याबाबतचे सविस्तर आदेश देखील निर्गमीत  करण्यात आलेले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गणेशोत्सव काळात डी. जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास डी. जे. व डॉल्बी असोसिएशने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शहरातील 13 डी. जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे स्वेच्छेने जमा करण्यात आले आहे. तसेच डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडीत माळी यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांकडे सुपुर्त केल्या आहेत.
यावेळी नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,  तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, डी. जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण बडगुजर, सचिव राकेश कापडे, मातोश्री साऊंडचे मालक योगेश बारी, राजज्याेती साऊंडचे मालक धिरज कुंवर, शिव मल्हार साऊंडचे मालक गणेश सुळ, एनडी साऊंडचे मालक भूषण कोळी, समर्थ साऊंडचे मालक वरुण चव्हाण, पवन साऊंडचे मालक पवन कोकणी, माऊली साऊंडचे मालक नितीन कुंभार, मारुती राया साऊंडचे मालक घारु कोळी, वैष्णवी साऊंडचे मालक संकेत भोईटे, साई समर्थ साऊंडचे मालक निलेश मराठे, साई सरकार साऊंडचे मालक शैलेश मराठे, रिद्धी सिद्धी साऊंडचे मालक खंडु माळी, विघ्नहर्ता साऊंडचे मालक बंटी जगताप, मंगलमूर्ती साऊंडचे मालक राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन केल्यास होणार शिक्षा
उल्लंघन केल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किंवा 1,00,000/ (एक लाख रुपये दंड) किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5000/ रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होवू शकते. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करु नये, तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/ 210113 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नंदुरबार : अधीक्षकांनी पारंपरिक वाद्याचे आवाहन करताच 13 डॉल्बी डीजे सिस्टीम स्वेच्छेने जमा appeared first on पुढारी.