नंदुरबार : आयशर ट्रक, ट्रव्हल्सचा भीषण अपघातात ३ ठार तर १८ जखमी

नंदुरबार

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शहादा येथे मजूर घेऊन जाणारी आयशर ट्रक आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक झाल्यामुळे 3 जणांचा जागी मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२९) दुपारी ४ च्या सुमारास शहादा शहरातील नवीन बस स्थानका जवळ घडला. जखमी प्रवाशांना व मजुरांना शहादा रुग्णालयात हलविण्यात आले आहे

या संदर्भात प्राप्त माहितीनुसार ऊसतोड मजुरांना नेणारा आयशर (क्र. एच १८ एए ९८५३) शहादा शहरातील नवीन बस स्थानक जवळील रस्त्याने जात असताना एका ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की आयशर गाडी अनेक फूट अंतरावर फेकली गेली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ही आयशर ऊसतोड मजुरांना घेऊन पंढरपूरकडे जात असताना ही घटना घडली. तर धडक देणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून सुद्धा ऊसतोड मजूर प्रवास करीत होते, ते ट्रॅव्हल्स मधून ते गुजरात राज्यातील संगमेश्वरकडे जात होते.

अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघात घडताच घटनास्थळी तातडीने नागरिकांनी धाव घेतली व रुग्णवाहिका बोलावून जखमींना शहादा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पोहचत अपघाताची पाहणी केली.

The post नंदुरबार : आयशर ट्रक, ट्रव्हल्सचा भीषण अपघातात ३ ठार तर १८ जखमी appeared first on पुढारी.