नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नव्या संकल्पनेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, निवेदने, संदर्भ, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी हे कार्यालय काम करेल. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आले असून या कक्षात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यात येवून त्याची पोचपावती संबंधित अर्जदारास देण्यात येईल. ज्या प्रकरणात जिल्हास्तरावरुनच कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशा प्रकरणांचा निपटारा जिल्हास्तरावरच करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय व शासनस्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील अर्ज, निवेदन जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे लेखी स्वरुपात द्यावेत, असे आवाहन देखील खांदे यांनी केले आहे.

हेही वाचा

The post नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना appeared first on पुढारी.