नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा 

नंदुबार जिल्ह्यातील आतापर्यंत 35 ग्रामपंचायतींचे निकाल हाती लागले असून यात भाजपची घोडदौड कायम असल्याचे दिसून येत आहे.  आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानूसार 17 ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. तर 10 ग्रामपंचायतींवर शिंदे गट, 4 ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस, तर 4 ग्रामपंचायतींवर अपक्ष असा विजय मिळवला आहे. मात्र, राष्ट्रवादी अद्याप शू्न्यावर आहे.

नंदुरबार तालुक्यात विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि आता शिंदे गटात गेलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये राजकीय लढत रंगलेली आहे. परिणामी विजयी झालेले ग्रामपंचायत सदस्य व सरपंच या दोन गटातच विभागलेले दिसणार आहेत. यात उद्धव ठाकरे गटाचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस पक्ष तुलनेने न्यून पडले आहेत. तथापि किती ग्रामपंचायती आपल्या समर्थकांच्या हाती आल्या याविषयीचा अधिकृतपणे दावा कोणीही केलेला नाही.

चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने गाव पातळीवर खाते उघडायला सुरुवात केली आहे. हे मात्र ग्रामपंचायत निकालातून अधोरेखित होत आहे तर दुसरीकडे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पातळीवर पुन्हा भक्कम बनलेली पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

The post नंदुरबार जिल्ह्यात भाजपची घोडदौड, शिंदे गटानेही उघडले खाते appeared first on पुढारी.