नंदुरबार : पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर मुख्याधिकाऱ्यांनीच चालवला जेसीबी

सुशोभीकरणावर जेसीबी,www.pudhari.news

नंदुरबार – शहरातील वाहतूक अडवणाऱ्या शासकीय बांधकामाला आधी हटवण्यात यावे ; अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी काल नंदुरबार नगर परिषदेतील आढावा बैठकीत दिल्या आणि लागोलाग आज 5 मे 2023 रोजी त्यावर त्वरित अंमलबजावणी करीत नंदुरबार नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी सर्व प्रमुख चौक आणि चौफुल्यांवरील पालिकेने केलेल्या सुशोभीकरणाचे बांधकाम तोडून शहरवासीयांना आश्चर्याचा धक्का दिला.

त्यामुळे नंदुरबार नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकास कामाचा दाखला म्हणून ज्या सुशोभीकरणाकडे बोट दाखवले जात होते, ते सर्व प्रमुख चौकांमधील बांधकाम आज उध्वस्त झालेले दिसले. परंतु यामागे राजकारणाचा भाग नसून रस्ते व्यापणारे सर्कल लहान करण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

नगरपरिषदेतील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागमूस लागू न देता मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी नंदुरबार शहरातील करण चौफुली, धुळे चौफुली तसेच नवापूर चौफुली येथे एकाच वेळी वेगवेगळे जेसीबी पथक पाठवून कारवाई केली. नवापूर चौफुली वरील इंदिरा स्मारक म्हणून ओळखले जाणारे सुशोभीकरण तसेच धुळे चौफुली वरील गजलक्ष्मी च्या स्वरूपातील सुशोभित सर्कल आणि करण चौफुलीवरील अशोक चक्र लावलेले सुशोभीकरण तोडले जात असल्याचे पाहून नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. हे सर्व सर्कल आकर्षण बिंदू मानले जात होता. परंतु या चौफुलीवरुन होणारी वाहतूक आणि जड वाहने यांना त्याचा प्रचंड अडथळा होत होता. ते लक्षात घेऊन या सुशोभीकरणाचे रस्ते व्यापणारे बांधकाम फक्त तोडण्यात आले. त्यांचा आकार लहान करणे आणि वाहतुकीला रस्ता मोकळा करणे हा या बांधकाम तोडण्यामागील हेतू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. करंट चौफुली वरील अशोक चक्र, नवापूर चौफुली वरील स्वर्गीय राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा तसेच धुळे चौफुली वरील गजलक्ष्मी ची मूर्ती हे तसेच कायम ठेवण्यात आले असून लहान आकारातील सर्कल बनविले जाणार आहेत.

नंदुरबार शहरातील रस्ते विकास सुशोभीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था करणे प्रमुख चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था लावणे अशी अनेक कामे प्रस्तावित असून नगरपालिकेला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे 115 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली आहे. येत्या महिन्याभरात या सर्व कामांचा प्रारंभ केला जाणार आहे आणि म्हणून पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नगरपालिकेत आढावा बैठक देखील घेतली होती व अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. नंदुरबार शहरातील प्रमुख चौकांमधील सुशोभीकरणाचे बांधकाम तोडून वाहतूक मोकळी करण्याच्या आज झालेल्या उपाययोजना हा त्याचाच भाग होता.

हेही वाचा :

The post नंदुरबार : पालिकेने केलेल्या सुशोभीकरणावर मुख्याधिकाऱ्यांनीच चालवला जेसीबी appeared first on पुढारी.