Site icon

नंदुरबार : भीषण आगीत 20 वाहनांसह शोरूम जळून खाक

नंदुरबार : शहादा शहरातील वाहन विक्री करणाऱ्या शोरूमला लागलेल्या भीषण आगीत वीस वाहनांसह संपूर्ण शोरूम जळून खाक झाले. ही भीषण आगेची घटना बुधवारी पहाटे म्हणजे मध्यरात्री साडेबारा वाजे दरम्यान घडली. या आगीमुळे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

शहादा शहरातील प्रकाशा वळण रस्त्या लगत जकीउदीन हमजा बोहरी रा. प्रकाशवाले यांच्या मालकीचेे ट्रॅक्टरचे शोरूम आहे. त्याला लागूनच इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनांचे शोरूम आणि शेती अवजारे विक्रीचे मोठे दुकान आहे. या शोरूमला लागून स्फोटक द्रव्य बॅटऱ्या विक्रीचे देखील दुकान आहे. मंगळवारी मध्य रात्री नंतर व बुधवारी पहाटे एक वाजे दरम्यान रोजे सोडून व नमाज अदा करून शहरात फिरत असतांना काही तरुणांना शोरूम मधून अग्नीच्या ज्वाला पसरत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने अन्य नागरिक धावून आले. पालिका अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. परंतु त्या अगोदरच वाहनांंनी पेट घेतला होता. बघता- बघता आगिने रुद्र रुप धारण केले.

शोरूम मधील सात ट्रॅक्टर, बारा दुचाकी मोटरसायकल, एक मारुती कार व शेती अवजारे असे एकुण सुमारे 76 लाख 14 हजारांची वाहने तसेच शेती उपयोगी साहित्य यात जळून खाक झाले. त्या सोबत शोरूम आगीत भस्म होऊन शोरूमचे सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शहादा नगरपालिकेचे अग्निशामक बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या व शहरातील नागरिकांनीही घटनास्थळी पोहोचून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन बंबावरील कर्मचाऱ्यांनी पुरेशी यंत्रणा नसताना किमया करीत सुमारे ५५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

पोलीस कर्मचारी अमोल राठोड यांनीही आग विजविण्यासाठी प्रयत्न केले. यात नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, गिरधर पाटील, राकेश बोरसे, सल्लाउद्दीन लोहार, दिनेश पाटील, दाऊदी बोहरा समाजातील माँअद मर्चंट, रोषण अली, अजीम शेख, इस्माईल शफी, अब्बास शफी, जोयेभ इजी, सज्जाद इजी, मोहम्मद ईजी, इस्माईल राजा, मुर्तीजा भाई, भुऱ्या लोहार, सलिमोद्दीन लोहार यासह अनेक शहरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल दादा बूवा, सचिन कापडे, अमोल राठोड, पोलीस मित्र पुर्वेश सुनेश, नारायण कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थिती हाताळली.

हेही वाचा : 

The post नंदुरबार : भीषण आगीत 20 वाहनांसह शोरूम जळून खाक appeared first on पुढारी.

Exit mobile version