नंदुरबार : मिश्राजींच्या शिवकथेमुळे प्रशासनाची एकच धावपळ

नंदुरबार,www.pudhari.news

नंदुरबार : येथील छत्रपती मल्टी स्पेशल हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एकदिवसीय शिवकथेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अर्धा डझन मंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे 22 एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्याला अलोट गर्दी होणार हे लक्षात घेऊन रस्ते बनवणे, वाहतूक व्यवस्था करणे यापासून तर बंदोबस्त लावण्यापर्यंतच्या पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातून जाणाऱ्या शहादा बायपास मार्गावर सुमारे 48 हजार स्क्वेअर फुट जागेत हे छत्रपती मल्टीस्पेशल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादासाहेब भुसे, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. याविषयी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी या सोहळ्याची माहिती देताना सांगितले की, सुमारे साडेतीन लाख भाविक बसू शकतील एवढ्या क्षमतेचा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येतील हे लक्षात घेऊन वाहतुकीचे तसेच पार्किंगचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या दौऱ्याची अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, 22 एप्रिल 2023 रोजी कथाकार मिश्राजी यांचे मध्य प्रदेशातील सिहोर येथून नंदुरबारला अकरा वाजता जीटीपी कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅड वर हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्या ठिकाणाहून खुल्या वाहनात बसवून पंडित  मिश्रा यांची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.

कॉलेज रोडवरून शनी मंदिर मार्गे अंधारे चौक जुनी नगरपालिका नेहरू चौक गांधी पुतळा आणि मग शेवटी रघुवंशी यांचे निवासस्थान म्हणजे राम पॅलेस येथे शोभायात्रा समाप्त करण्यात येईल. एक वाजता मुख्यमंत्री व अन्यमंत्र्यांसमवेत मिश्राजी यांचे भोजन होईल नंतर शहादा बायपास रोडवरील छत्रपती मल्टीस्पेशल हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याला ते दुपारी दोन वाजता उपस्थित राहतील. सभा मंडपात प्रथम मुख्यमंत्री व उपस्थित मंत्री संबोधन करतील त्यानंतर दोन तास शिवकथा होईल. चार वाजता शिवकथा समाप्ती करण्यात येईल व पंडित मिश्रा हेलिकॉप्टरने रवाना होतील अशी माहिती चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

छत्रपती मल्टीस्पेशल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर तुषार रघुवंशी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, हृदय शस्त्रक्रिया सोडून अन्य सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था या रुग्णालयात राहील. नंदुरबार जिल्ह्यातील 125 बेडचे हे असे भव्य पहिले रुग्णालय उभारण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राम रघुवंशी, डॉक्टर तुषार रघुवंशी, माजी नगरसेवक यश रघुवंशी, माजी सभापती कैलास पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नंदुरबार : मिश्राजींच्या शिवकथेमुळे प्रशासनाची एकच धावपळ appeared first on पुढारी.