नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असतांनाही खटाटोप करून खोटी माहिती पुरवून रेशन धान्य सवलत उचलत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, शासननियमानुसार विहित उत्पन्नापेक्षा उत्पन्न अधिक असल्याचे प्रामाणिकपणे सांगत रेशन धान्य सवलत बंद करण्याचे निवेदन दोन ज्येष्ठ नागरिकांनी दिले आहे. प्रशासनाला हा सुखद धक्का असून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांकडे केशरी शिधापत्रिका असून त्यांना अनुदानित धान्य सोबत मिळते. मात्र उत्पन्नवाढ झाल्याने अनुदानित राशनधान्य सवलत ऑगस्ट-2022 पासून बंद करण्याबाबतचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय कुटुंब योजना मधील लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात दरमहा अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक वेळा लाभार्थी यांचे अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तींचे उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे ते राशनधान्याची उचल करत नाही. मात्र, त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अन्य शिधापत्रिकाधारकांना शिल्लक रेशनचा लाभ मिळत नाही. परिणामी अनेक गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे विहीर उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन महेश शेलार यांनी केले.

यांनी केला धान्यपुरवठा बंद: 
ज्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य नको असेल त्यांनी पुरवठा विभाग किंवा संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे अर्ज केल्यास त्यांचा धान्य पुरवठा खंडित करण्यात येतो, असेच एक लाभार्थी काशिनाथ पाटील व चकोर यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन दिल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे.

तरच लाथ्यार्थ्यांपर्यंत लाभ मिळेल :
ज्या शिधापत्रिकाधारक यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रुपये ४४००० व शहरी भागात रुपये ५९००० यापेक्षा जास्त असेल. त्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे. जेणेकरून अन्य गरजू लाभार्थी यांना योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना सवलतीच्या दरातील अन्नधान्य पुरवठा करणे शासनास शक्य होणार आहे. तालुक्यातील निराधार विधवा व वृद्ध, शेतमजूर, रोजंदारी मजूर, घरगुती काम करणाऱ्या घरेलू मोलकरीण, अतिशय लहान व्यवसाय करणारे कुटुंबीय, हातगाडीवर किंवा फिरते व्यावसायिक अशा शिधापत्रिकाधारक यांना उदरनिर्वाह करणे कठीण आहे त्यांना रेशनचे धान्य मिळणे गरजेचे आहे. सधन कुटुंबांनी योजनेतून बाहेर पडल्यास अशा गरजू कुटुंबांना लाभ देण्यात येईल.

चुकीचे उत्पन्न दाखवून शासनाची दिशाभूल करून लाभ घेतल्यास प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचे देखील शासनास अधिकार आहेत. शहरी भागात मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग व व्यावसायिक असून त्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडा. – रमेश वळवी, पुरवठा निरीक्षण अधिकारी.

हेही वाचा:

The post नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज appeared first on पुढारी.