नंदुरबार: ८ वर्षापासून फरार असलेल्या मद्यतस्करास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : गुजरात सीमेवर मद्यतस्करी करणाऱ्या आरोपीला 29 लाख 95 हजार रुपयांच्या मद्य आणि मुद्देमालसह जेरबंद करण्यात आले. रुस्तम जमनादास गावीत (वय 35, रा. पिपलकुवा, ता. सोनगढ, जि. तापी, गुजरात, सध्या रा. लक्कडकोट, ता. नवापूर, जि. नंदुरबार) असे त्याचे नाव आहे. गावित आठ वर्षापासून फरार होता. गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक तो करत होता. त्याच्या तक्रारी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाल्या होत्या. त्यानुसार पाटील यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथे रुस्तम गावीत हा चारचाकी वाहनांमधून महाराष्ट्रातून गुजरात राज्यात अवैध दारुची चोरटी वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या पथकाने लक्कडकोट येथे आरोपीच्या घराच्या आजुबाजुला स्थानिक नागरिकांच्या वेशभूषेत वेशांतर करुन सापळा रचला. तसेच आरोपी रुस्तम जमनादास गावीत याच्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवली. दरम्यान, पथकाने गावीत याच्या घरावर छापा टाकला असता तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केलेल्या ३ चारचाकी वाहनात मद्य साठा आढळून आला. यावेळी एकूण 29 लाख 95 हजार 680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा. पोलीस उप निरीक्षक गुमानसिंग पाडवी, पोलीस हवालदार दादाभाई वाघ, दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, प्रेमचंद जाधव, पोलीस अंमलदार दिनेश बावीस्कर, गणेश बच्छे, श्याम पेंढारे, रणजित महाले, किशोर वळवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

The post नंदुरबार: ८ वर्षापासून फरार असलेल्या मद्यतस्करास अटक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.