नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला

दागिने डल्ला www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीसह शहरातील कालिका देवीच्या यात्रोत्सवात चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र असून, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइलवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यासह मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी जिल्ह्यातील अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून, या गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि.2) सुटीचा वार असल्याने नाशिकसह परजिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी कळवण तालुक्यातील नांदुरी बसस्थानकावर रविवारी (दि.2) दिवसभरात 10 भाविकांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा पाच लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सचिन सदाशिव चित्ते (33, रा. सटाणा) यांच्या फिर्यादीनुसार ते देवी दर्शनासाठी जात असताना बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सचिन यांच्यासह इतर भाविकांकडील 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 25 हजार रुपयांचे दोन मोबाइल व पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली येथील रहिवासी सुदाम अरुण चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने गर्दीचा फायदा घेत तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. धुळे येथील रहिवासी अंजना श्यामकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने अंजना यांच्याकडील दोन तोळे वजनाची पोत चोरून नेली. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात चोरीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातील कालिका देवी यात्रोत्सवातही चोरट्यांनी हाथ की सफाई केली आहे. सरला प्रकाश दुनबळे (60, रा. हॅप्पी होम कॉलनी) यांच्याकडील मोबाइल, 10 हजार रुपयांची रोकड असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आहे. चोरीचे प्रकार घडले असून, तक्रारदार पोलिसांपर्यंत गेल्यास चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सप्तशृंगगडावर झालेल्या चोर्‍या :

सचिन चित्ते (सटाणा) व इतर भाविकांकडील 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 25 हजार रुपयांचे दोन मोबाइल व पाच हजार रुपयांची रोकड, असा तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज.

सुदाम चव्हाण (डोंबिवली) यांच्याकडील तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरली.

अंजना पाटील (धुळे) यांची दोन तोळे वजनाची पोत चोरून नेली.

कालिका देवी परिसरातील चोर्‍या :  सरला दुनबळे (हॅप्पी होम कॉलनी) यांच्याकडील मोबाइल, 10 हजार रुपयांची रोकड असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सवात भाविकांच्या दागिने, मोबाइलवर चोरट्यांनी मारला डल्ला appeared first on पुढारी.