नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता !

कुंजनीमाता www.pudhari.news
देवगाव : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांवच्या कुंजनी गडावर निसर्गाच्या सानिध्यात आई कुंजनी माता वसलेली आहे. साधारणतः सन २००२-०३ साली कुंजनी मातेची गावकऱ्यांनी प्रतिष्ठापना केली आहे. कुंजनी गडाचा इतिहास जुना असून आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचा या गडाशी संबंध असल्याचे जुने जाणकार सांगतात.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुंजनी गडावर नवरात्रोत्सवात देवगांवसह पंचक्रोशीतील भाविक श्रध्देने येथे हजेरी लावतात. इगतपुरी येथील शैलीपुत्री घाटनदेवीची प्रतिकृती असलेल्या कुंजनी मातेच्या लोभस मूर्तीमुळे भक्तांना मातेकडे येण्याची ओढ लागते. कुंजनी मातेच्या लोभस रूपाचे खास वैशिष्ट्य चमकदार डोळे भक्तांना खास आकर्षण ठरत आहे. शारदीय नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिप्रदेपासून नऊ दिवस नवरात्र उत्सव असतो. यावेळी मंदिरात घट बसविले जातात. नवरात्रात देवीला नऊ दिवस नऊ पैठण्या नेसविल्या जातात. रोज नवीन शृंगार केला जातो. या दिवसांत रोज वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीचे दर्शन होते, असे भक्त मानतात. भक्तांना गडाकडे प्रस्थान करण्यासाठी देवगांवपासून पायी वाट आहे. तसेच वावीहर्ष, टाकेदेवागव येथून येण्यासाठी मार्ग आहेत.
असा आहे इतिहास… 
पूर्वी या गडाचे नाव कृंरूदगड असे होते. मात्र, २००३ साली माजी सरपंच कै. मंगेश वारे यांच्या स्वप्नात येऊन देवीने गडावर बसण्याचा कौल देऊन इच्छा व्यक्त केली. त्यांनी गावकाऱ्यांपुढे प्रस्ताव ठेऊन गडावर देवीची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे कृंरूदगडाचे कुंजनी असे देवीच्या नावाने नामकरण झाले. तिथंपासून देवगांव परिसरातून कुंजनी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी जमत आहे. देवगाव येथील साईबाग रिसॉर्टचे मालक बन्सल व गावकऱ्यांच्या मदतीतून  २०१० साली कुंजनी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून कुंजनी मातेची सुंदर, लोभस संगमवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शारदीय नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिप्रदेपासून नऊ दिवस नवरात्र उत्सव असतो. या कालावधीत जागर, गोंधळ नऊ दिवसांत देवीच्या जागरासाठी असतो. लोक भक्ती भावाने देवीची मने भावे पूजा करतात. त्यामुळे हाकेला धावणारी कुंजनी माता अशी मातेची ओळख झाली आहे. त्यामुळे वर्षभर गडावर भक्तांचा ओघ असतो.  – सोमनाथ वारे, पुजारी.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : कुंजनगडाच्या टेकाडीवर वसली आई कुंजनी माता ! appeared first on पुढारी.