नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर

सप्तशृंगी माता www.pudhari.news

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून (दि. 26) प्रारंभ होत असून, दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेले मंदिर व देवी मूर्तीच्या संवर्धनाचे नुकतेच झालेले काम यामुळे मूळ रूपातील देवी दर्शनासाठी भाविक उत्सुक झाले असून, गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा चोख नियोजन करण्यात आले आहे.

सप्तशृंगगड हे देशातील शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सप्तशृंगनिवासिनी देवीपर्यंत सुमारे 500 पायर्‍यांची चढण आहे. आता फनिक्युलर ट्रॉलीचीही सुविधा करण्यात आलेली आहे. यात्राकाळात मंदिर पूर्णवेळ खुले राहणार असून, नवरात्रोत्सवात देवीचे आकर्षक रूप नजरेस भरते. कुंकू व वस्त्रांचेही रंग दिवसानुसार योजलेली असून, सोमवारी पांढरा, मंगळवारी हिरवा, बुधवारी निळा, गुरुवारी पिवळा-केसरी, शुक्रवारी गुलाबी, शनिवारी जांभळा, रविवारी तांबडा लाल अशा रंगाच्या साड्या देवीला नेसविल्या जातात तसेच कुंकू हे वेगवेगळ्या प्रकारे लावले जाते. दररोज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटत असते. त्या पार्श्वभूमीवर ट्रस्टने नियोजन केले आहे. ट्रस्टने भाविकांसाठी निवास व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी 200 खोल्या, एकाच वेळी हजारोंच्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, असे प्रसादालय, धर्मार्थ दवाखाना, शिवालय तलावाचे सुशोभीकरण आदी प्रमुख कामे पूर्ण केली असून, गडावर येणार्‍या भाविकांचा सुरक्षेच्या द़ृष्टीने विमा काढलेला आहे. नवरात्र कालावधीत घटस्थापना, भगवतीची पंचामृत महापूजा, शतचंडी याग, होमहवन पूजा, श्री भगवती शिखरावर ध्वजारोहण, पूर्णाहुती, नऊ दिवस खडकबाण आदी उपक्रम व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण :
आधी कोरोना काळात मंदिर बंद, तर गत काही दिवस मूर्ती संवर्धनासाठी मंदिर बंद असल्याने येथील व्यापारी, विक्रेत्यांचे अर्थचक्र थंडावले आहे. मात्र, नवरात्रोत्सवापासून मंदिर खुले होणार असल्याने आणि भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येणार असल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या काळात वरुणराजा येतो की काय, याचीदेखील चिंता विक्रेत्यांमध्ये आहे.

बोकडबळी याचिका; सुनावणीकडे लक्ष :

श्री सप्तश्रृंगीदेवी गडावर मंदिर परिसरात होणारी बोकडबळी प्रथा 2017 पासून बंद आहे. ही वर्षानुवर्षांची परंपरा मंदिर परिसराबाहेर स्थानिक ग्रामस्थ करत आले आहेत. आता ग्रामस्थांनी पुन्हा केलेली मागणी व धोडंबे (ता. सुरगाणा) येथील आदिवासी विकास सोसायटीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी (दि. 26) सुनावणी होणार असल्याने तूर्त तरी बोकडबळी हा गावाबाहेरच होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि 23) कळवणच्या मध्यवर्ती इमारतीत प्रांताधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य व अन्य प्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यात आली. बोकडबळीची परंपरा पूर्वीसारखी सुरू ठेवण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. दसर्‍यानिमित्त सप्तशृंगगडावर बोकडबळी देण्याची प्रथा आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रथेनिमित्त देण्यात आलेल्या सलामी (बंदुकीतून हवेत गोळीबार करणे) देताना छर्रे उडून काही भाविक, देवस्थानचे कर्मचारी दुखापतग्रस्त झाले होते. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्टतर्फे ही प्रथा सुरक्षिततेच्या द़ृष्टीने बंद करण्यात आली. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आदेशही काढले होते. देवस्थान ट्रस्टच्या आवाराबाहेर करण्यात आजही हरकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी कळवण तालुका प्रशासन व ग्रामस्थ व भाविक यांच्यात बोकडबळी होऊ द्यावे, जुन्या परंपरेला खंडित होऊ देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. यापूर्वी बोकडबळी देताना आहुती मंदिर परिसरात देण्यासाठी प्रतिसाद मिळाल्याने बळी मंदिर परिसराबाहेर दिला जातो व आहुतीसाठी मंदिर परिसरात परवानगी असते. तत्कालीन देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व तहसीलदार कैलास चावडे यांनी याबाबत सुरक्षिततेच्या द़ृष्टीने देवस्थान ट्रस्ट आवारात ही प्रथा पूर्णपणे बंद राहील, असे फर्मान काढले होते. त्यावेळी प्रशासन व देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांच्या भेटीत दोन वेगवेगळ्या बाबी पुढे आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आपले व्यवसाय ऐन नवरात्रीच्या दिवसांत बंद ठेवत ट्रस्ट कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. त्यामुळे बोकडबळी प्रथेसाठी संघर्ष पेटल्याचे दिसून आले होते. याबाबत धोडंबे आदिवासी विकास सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी ही प्रथा पूर्वीच्या परंपरेनुसार सुरू करावी, अशी भूमिका मांडली आहे. त्या द़ृष्टीने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या सोमवारी पहिल्या माळेला सुनावणी होणार असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, बैठकीत उपस्थितांची भूमिका जाणून घेत प्रांताधिकारी विकास मीना, तहसीलदार बंडू कापसे यांनी बंदी तूर्त तरी कायम ठेवली आहे.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर appeared first on पुढारी.