नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
तब्बल तीन वर्षांनंतर भरलेला यात्रोत्सव, त्यात सलग दोन दिवस आलेल्या शासकीय सुट्या अन् शारदीय नवरात्रोत्सवाची सातवी माळ असा तिहेरी योग साधत चांदवडच्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 2) राज्यातील भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता. प्रचंड गर्दीने चालणेदेखील मुश्कील झाले होते. दर्शनासाठी पायर्‍यांच्या खालपासून भाविकांच्या रांगा लागल्याने दिवसभरात मातेच्या चरणी एक ते दीड लाख भाविक भक्त लीन झाल्याची माहिती व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.

रविवारी सुटीमुळे भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी तालुक्यातील व बाहेरच्या भाविकांनी गर्दी केल्याने मंदिर, परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी रांगेत उभ्या राहणार्‍या भाविकांचे ऊन व पावसापासून रक्षण होण्यासाठी ट्रस्टच्या वतीने ताडपत्री लावण्यात आली आहे. तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने भाविक-भक्त तृप्त झाले. शारदीय नवरात्रोत्सव काळात दोन ते तीन हजार महिला व पुरुष देवीमंदिराच्या भक्तनिवासात घटी बसले आहेत. त्यांना दररोज लागणार्‍या आवश्यक वस्तूंची पूर्तता श्री रेणुकादेवी ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. शारदीय नवरात्रोत्सव काळात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पहाटे, दुपारी, सायंकाळी व रात्रीच्या सुमारास महाआरती करण्यात येत आहे. आरतीला उपस्थित राहण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाकाळानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे.

सकाळी अकरापासून वाहतूक ठप्प :
रविवारी पहाटेपासून नागरिकांनी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात एक-दोन वाहने खराब झाल्याने नाशिककडून मालेगावकडे जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावर देवी मंदिर ते भैरवनाथ हॉटेलदरम्यान सकाळी 11 पासून वाहतूक ठप्प झाली होती. दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच राहिल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. या वाहतूक कोंडीमुळे महामार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : रेणुकामातेच्या दर्शनासाठी लोटला जनसागर appeared first on पुढारी.