नवरात्रोत्सव : सातव्या माळेला गडावर दर्शनासाठी भाविकांचा झाला मनस्ताप

सप्तशृंगीगड

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा

गडावरील सप्तशृंगी देवी ही आदिमाया भगवती म्हणून ओळखली जाणारी देवी असून शारदीय नवरात्रोत्वात येथे  भाविकांची मोठी मांदीयाळी असते. त्यानुसार भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानने पूर्वतयारी करणे आवश्यक असताना तसेच दोन महिन्यांपासून मंदिर बंद स्थितीत असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने याबाबत विभागानुसार चर्चा करून नियोजन आखले होते. मात्र ही चर्चा फोल ठरल्याने ऐन नवराञीच्या सातवी माळेला भाविकांचा जनसागर लोटल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारचा फटका भाविकांना बसला.

भाविकांच्या सोईसुविधेकडे लक्ष न पुरवता मंदिर प्रशासन शासकीय अधिकारी हे व्हीआयपी ना कशाप्रकारे दर्शन घेता येईल आणि आलेल्या संधीचे कसे सोने करता येईल या गोष्टीमध्ये व्यस्त होते. एकीकडे यात्रोत्सवात जिल्हाधिकारी यांनी गडावरती खाजगी वाहनांना जाण्यासाठी बंदी असल्याचा आदेश काढला असतानाही काही खासगी वाहने गडावर हाकण्यात आल्या. तर इकडे सर्वसामान्य भाविकांनी आतुरतेने तासनतास भर उन्हात आणि अचानक आलेल्या पावसात उभे राहून देवीचे दर्शन घेतले. त्यानंतरही सर्वसामान्य भाविकांना लालपरीच्या प्रतिक्षेसाठी मनस्ताप सहन करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे वेळापत्रक ठरवून दिले असतांनाही प्रशासनाने त्याचा मागोवा घेतला नसल्याने लालपरी मात्र वेळेवर येतच नव्हती. त्यात भाविकांचा गर्दीचा पूर ओसंडल्याने ज्येष्ठ व लहान बालकांची हेळसांड झाली. तर काही भाविकांना दूरवरुन येऊनही केवळ गर्दी असल्याने समाधानाने दर्शन न घेता परतीचा मार्ग स्विकारावा लागला.  बससेस नसल्याने भाविकांना मेळाबसस्थानक पासून तर गावापर्यंत पायी प्रवास करावा लागला. गडावर नवरात्रीच्या सातव्या माळेला महत्व असल्याने सातव्या दिवशी एस टी आगार कळवण यांनी नियोजन करणे आवश्यक असताना त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांना ञास सहन करावा लागला  याञोत्सवाच्या बैठकीत संबधीत विभाग मोठ्या प्रमाणावर नियोजनाबाबत कामांची सरबत्ती सांगत असतात. मात्र, प्रत्यक्षात शुन्यकारभार दिसून आला. याचा बोध तरी पुढील नवरात्रोत्सव संबंधितांना घ्यावा, असे भाविकांकडून सांगण्यात येत आहे.

व्हीआयपींची बडदास्त…
सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सोवाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन चोख बंदोबस्ताबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या व्ही.आय.पी. च्या बडदास्त राखण्याची जबाबदारीही पोलिस कमर्चान्यांवर असते. परंतु, देवीच्या दारात सगळे सारखेच असल्याचे वरवर सांगण्यात येत असले तरी व्ही.आय.पी. म्हणवून घेणाऱ्यांच्या संख्येत भाविकांमध्ये वाढ झाल्याचे येथे दिसून आले. सरकारी यंत्रणा जणू देवाच्या दारातही आपलीच बडदास्त राखण्यासाठी आहे, असा आविर्भाव दिसून आला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलीस, वन विभाग, आरोग्य विभाग यांचे प्रस्थान होईपर्यंतची जबाबदारी पोलींसावर होती.  त्यांची उठबैस करण्यासाठी स्वत:ची कार्यक्षमता पणाला लावावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. व्हीआयपी आले की, वारंवार होणा-या रस्ता बंदमुळे सर्वसामान्य भाविकांना ना समाधानाने दर्शन घेता आले ना देवीसमोर गा-हाणे मांडता आले. त्यांच्या भाळी केवळ समस्यांना सामोरे जाणे हेच आले.

नवरात्रोत्सवाच्या प्रारंभापासून सुमारे पाच ते साडेपाच लाख भाविकांनी सप्तशृंगगडावर हजेरी लावण्याचा अंदाज असतो. यात्रा कालावधीत शांतता व सुरक्षिततेच्या दुष्टीने व्ही आय पीचा राबता जास्त असल्याने सर्वसामान्य जनता वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.  यापुढे जिल्हाधिकारी खाजगी वाहनांना (मर्जीतील) वाहनावर काय निर्णय घेतले जातील हे येणाऱ्या चैञोत्सवात समजेल

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : सातव्या माळेला गडावर दर्शनासाठी भाविकांचा झाला मनस्ताप appeared first on पुढारी.