Site icon

नवरात्रोत्सव : सिन्नरला ग्रामदैवत ‘जय जगदंब’चा सामूहिक निनाद

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
ग्रामदैवत गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात नूतन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता पंचमीच्या मुहूर्तावर भाविकांच्या अमाप उत्साहात संपन्न झाला. भगवती देवी आरती मंडळ, मंदिराच्या पूजारी शोभा तनपुरे यांनी सहकार्य केले. संबळ-पिपाणीचा निनाद, वेदमंत्रांचा घोष आणि भाविकांनी केलेल्या ‘जय जगदंब’च्या सामूहिक निनादात 500 किलो वजनाच्या देवीच्या धातूच्या मूर्तीची व संगमरवरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रतिष्ठापना कार्यात योगदान देणारे वास्तुविशारद महेंद्रकुमार तारगे व त्यांचे सहकारी, सिन्नर पुरोहित संघ, वजनदार मूर्ती गाभार्‍यापर्यंत पोहोचविण्यासाठी कौशल्य पणाला लावणारे दिलीपभाई लिबानी, अशोक शेळके, मूर्तिकार मयूर मोरे यांचा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विवेक चांडक, प्रमोद चोथवे, मनोज भगत आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवरात्रीनिमित्त मंदिरास दिव्यांची आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. मंदिरासमोरील दीपमाळ ही रोज झळाळते आहे. विविध प्रकारची खेळणी, विविध वस्तू विक्रीची दुकाने, उभारलेल्या स्वागत कमानी, खाद्यपदार्थांची दुकाने यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तीन दिवसांत 63 जणांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन
तीन दिवसीय पूजन सोहळ्यात रोज 21 दाम्पत्य याप्रमाणे 63 जणांनी दिवसभर शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले. मंगल वाद्यांच्या गजरात स्तोत्र, भजन, आरती यामुळे वातावरण भक्तिरसात चिंब झाले होते. सागावर नक्षीकामाची कमान व आनुषंगिक नक्षीकामाने सजावट केलेल्या नूतन गाभार्‍यातील प्रतिष्ठापित नूतन आकर्षक मूर्तीचे लोभसवाणे रूप भाविकांना प्रसन्न करीत आहे. नवरात्रीनिमित्त दर्शनास भाविकांची अलोट गर्दी होत आहे.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : सिन्नरला ग्रामदैवत ‘जय जगदंब’चा सामूहिक निनाद appeared first on पुढारी.

Exit mobile version