नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

Police

नाशिक : पुढारी वृत्तसेवानववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले असून, त्यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मद्यपी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ब्रेथ अॅनालायजर मशीनमार्फत तपासणी केली जात असून, पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे. रात्री आठपासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे टवाळखोरांसह, सराईत गुन्हेगारांचीही धरपकड केली जात आहे.

येत्या रविवारी (दि.३१) ‘इयर एंड’चे निमित्त करून अनेक जण मित्र, नातलगांसोबत पार्टीचे नियोजन करीत आनंद लुटण्याचे बेत आखत आहेत. त्यासाठी शहरातील हॉटेल, फार्म हाउससह घरांमध्ये पार्टीचे नियोजन केले आहे. मद्यसेवन करून वाहने चालवल्यानंतर अपघातांची शक्यता वाढत असल्याने पोलिसांनी मद्यपी चालकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. तसेच शहरातील प्रमुख चौक, रिकामे भूखंड, मैदाने व संशयास्पद ठिकाणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांची गस्त सुरू आहे. वाहतूक विभागाच्या चारही युनिटने स्वतंत्र बंदोबस्त तैनात करून ‘ड्रँक अँड ड्राइव्ह’ कारवाईला सुरुवात केली आहे. शहराबाहेरून येणाऱ्या रस्त्यांवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. तर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवरही पोलिसांनी नजर ठेवली आहे. सीसीटीव्हींमार्फत नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवले जात आहे. ताब्यात घेतलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हे नोंद करण्याची तंबीदेखील पोलिस आयुक्तालयाने दिली आहे. त्यामुळे नाशिककरांनी नियम पाळून आनंद साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

बंदोबस्ताचे नियोजन…

– पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, सात सहायक आयुक्तांसह १३ पोलिस ठाण्यांचा बंदोबस्त तैनात असेल. तसेच ३ गुन्हे शाखा, ४ गुन्हे शोध पथके, वाहतूक शाखा यांचाही बंदोबस्त आहे. शहरात पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदीसह वाहन तपासणी केली जात आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या हजर असून होमगार्डचे जवान, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकही तैनात आहे.

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शहरात पोलिस ठाण्यांसह वाहतूक पथकांचा बंदोबस्त तैनात आहे. नाकाबंदी करून मद्यपींची तपासणी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. – चंद्रकांत खांडवी, पोलिस

हेही वाचा :

The post नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क appeared first on पुढारी.