नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य,www.pudhari.news

नाशिक : नितीन रणशूर
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. दरवर्षी साधारणत: सप्टेंबरअखेरपासून विदेशी पक्षी नांदूरमध्यमेश्वरमध्ये दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी सर्वदूर पाऊस झाल्याने विदेशी पक्ष्यांचा प्रवास लांबला आहे. विदेशी तसेच स्थानिक पक्ष्यांचे अभयारण्यात आगमन झाले असले, तरी संख्या रोडावली आहे. त्यामुळे पर्यटकांना विदेशी पाहुण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होत असते. युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका, शेजारील आशियाई देशांतून मोठ्या संख्येने पक्ष्यांचे स्थलांतर होत असते. त्यामध्ये थापट्या, गढवाल, तरंगपक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, पिनटेल कोंबडक, मूर हेन, छोटा मराल, ऑस्प्रे, काइट, मार्श हॅरिअर, ईगल, पेटेंड स्टोर्क, प्लासगल, कॉमन क्रेन, स्पून बिल, फ्लेमिंगो, स्पोटेड ईगल आदींचा समावेश असतो.

सध्या युरेशियन कॉलर्ड, ग्रेटर कौकल, युरेशियन कूट, ब्लॅक-पिंग्ड स्टिल्ट, वॉटल्ड लॅपविंग, ब्लॅक-टेलेड गॉडविट, कॉमन स्नाइप, वूड सँडपायपर, ओरिएंटल प्रॅटिनकोल, पेंटेड स्टॉर्क, ओरिएंटल डार्टर, जांभळा बगळा, लिटल एग्रेट, हेरॉन, घुबड, व्हाइट-थ—ोटेड किंगफिशर, कॉपरस्मिथ बार्बेट, ब्लॅक ड्रोंगो आदी पक्षी अभारण्यात दिसून येत आहेत. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अद्यापही हरियाल, चमचा, कांडेसर, लाल डोक्याचा बदक, चक्रवाक, थापट्या, भुवई, चक्रांग आदी पक्ष्यांची प्रतीक्षा कायम आहे.

जुलै महिन्यात सुमारे साडेतीनशे ते चारशे फ्लेमिंगोंच्या थव्याने अभयारण्यात मुक्काम ठोकला. ऐन पावसाळ्यात फ्लेमिंगोंचे नांदूरमध्यमेश्वर येथे आगमन झाल्याची पहिलीच घटना होती. दोन – तीन महिने आधीच फ्लेमिंगोंनी हजेरी लावल्याने पर्यटकांना फ्लेमिंगोंचे सहज दर्शन होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, विदेशी पक्ष्यांची संख्या अधिकच रोडावल्याने अभारण्यातील पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला आहे.

हेही वाचा :

The post नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील विदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली appeared first on पुढारी.