नाट्यप्रेमींना प्रतीक्षा : कालिदास कलामंदिरचे शुल्क कमी होणार?

कालिदास www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाकवी कालिदास कलामंदिर-2019 पासून नवीन रूपात नाशिककरांना उपलब्ध झाले आहे. परंतु, अनेक अटी-शर्तीनुसार कधी नाटकांचे तिकीटदर जास्त, तर कधी वेळेचे बिघडलेले नियोजन यामुळे अनेक समस्यांचा सामना कलाकार, प्रेक्षकांना करावा लागतो.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी नाशिक दौर्‍यावर आले असता अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने येथील समस्यांचा पाढाच वाचण्यात आल्याने याबाबत उद्योगमंत्र्यांनी दखल घेत आयुक्तांना कालिदास कलामंदिरचे भाडे कमी करण्याची सूचना दिली आहे. याबाबत मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांंच्या उपस्थितीत बैठक होणार असून, यात भाडे कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या असलेले दर हे अवास्तव असून, महाराष्ट्रात कुठेही असे दर नाहीत. तसेच नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी पुणे, मुंबईहून नाशिकला येणार्‍या संस्थांना उशीर झाल्यास सत्राच्या वेळेनंतर 10-15 मिनिटांच्या जादा वेळेसाठी दंड आकारण्यात येत असल्याची तक्रार आहे. तर कलामंदिरात नाटकांचे तिमाही प्रयोग आरक्षित करताना होणारा नाट्यप्रयोग हा निश्चित नसतो. कधी कधी चार सहा दिवसांपूर्वी होणारा प्रयोग काही कारणास्तव रद्ददेखील होतो. त्याऐवजी दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा लागतो. अशावेळी भाडेदरातील फरक कार्यक्रमाआधी भरला जातो. यामध्ये महानगरपालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसात होत नाही. त्यामुळे गरज पडल्यास कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाडे फरक भरण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने दर दोन वर्षांनी वि. वा. शिरवाडकर (लेखन), प्रा. वसंत कानिटकर (रंगकर्मी) व बाबूराव सावंत (नाट्यकर्मी) पुरस्कार देण्यात येतात. या कार्यक्रमांसाठी महाकवी कालिदास कलामंदिर विनामूल्य उपलब्ध करून द्यावे. या नियमात बदल करण्याची मागणी परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह प्रमुख सुनील ढगे यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाट्यप्रेमींना प्रतीक्षा : कालिदास कलामंदिरचे शुल्क कमी होणार? appeared first on पुढारी.