नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे

 नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
ज्या उद्धव ठाकरेंमुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना दोनवेळा पाडले. त्यांच्या मुलाला लोकसभेत पाडले. तसेच राणे हे जामिनावर बाहेर असून, न्यायालयाने ज्यांचे घर पाडण्याचा आदेश दिला आहे, त्यांनी शिवसेनेला शिकवू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाचा समाचार घेतला. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी दानवे मनमाडला आले असताना, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. दानवे म्हणाले की, सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून, पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. असे असताना, सरकारकडून त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावी. राज्यात आघाडी सरकार सत्तेत असताना, देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना बोनस देण्याची मागणी केली होती. आता ते सत्तेत आले आहेत. त्यांनी पोलिसांना बोनस द्यावा, अशी मागणी केली. तसेच भाजप शिवसेना संपल्याचा प्रचार करत आहे. मात्र, त्यांनी शिवसेनेतून आमदार फोडले, त्यांना मनसेची मदत घ्यावी लागते. दिल्लीची ताकद आणावी लागते. त्यामुळे शिवसेना संपली नाही, तर जिंकल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आ. दानवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे अधिकार्‍यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले. मंचावर संपर्कप्रमुख जयंत दिंडे, उपसंपर्कप्रमुख अल्ताफ खान, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, आ. नरेंद्र दराडे, राजेंद्र देशमुख, संतोष बळीद, संतोष गुप्ता, माधव शेलार, प्रवीण नाईक, प्रमोद पाचोरकर, संजय कटारिया, कैलास गवळी, स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये : अंबादास दानवे appeared first on पुढारी.