नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

ड्रायव्हिंग स्कूल www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके
तब्बल चार ते पाच वर्षांपासून बेकायदेशीरपणे ड्रायव्हिंग स्कूल चालविणार्‍या संशयितावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केल्याने बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अशी आणखी ड्रायव्हिंग स्कूल असण्याची शक्यता आरटीओ वर्तुळात व्यक्त केली जात असून, आता तरी प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का, असा सवाल केला जात आहे.

बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलमुळे कायदेशीरपणे वाहन चालविण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणार्‍या प्रामाणिक ड्रायव्हिंग स्कूलधारकांवर एकप्रकारे अन्याय होत असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कमी शुल्काचे आमिष दाखवून चालकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. आरटीओने कारवाई केली तो ड्रायव्हिंग स्कूलचालक गेली अनेक वर्षे हा व्यवसाय बेकायदेशीररीत्या करत असल्याने आरटीओ विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आरटीओने वेळीच कडक पावले न उचलल्यास अशा प्रकारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘फ्लाइंग स्कॉड’लाही आव्हान प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अवैध वाहतूक, अतिरिक्त मालवाहतूक, बेकायदेशीर वाहतूक यावर अंकुश ठेवण्यासाठी फ्लाइंग स्कॉडची नेमणूक केली आहे. ही बाब या स्कॉडच्या नजरेतून सुटलीच कशी? शिवाय या स्कॉडकडून ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केली जाते की नाही, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. अनेक वाहनांवर केवळ ड्रायव्हिंग स्कूलचा फलक असतो. या वाहनांची तपासणी होणे गरजेचे आहे.

‘आरटीओ’च्या डोळ्यात धूळ फेक
गेल्या चार ते पाच वर्षांपासून भंडारी हे बेकायदेशीर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले आहे. या काळात त्याने जवळपास 700 हून अधिक वाहनचालकांना प्रशिक्षण दिल्याचेदेखील समोर आले असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन चालवण्याचे परवाने काढून दिले आहेत. या वाहनावर कुठल्याही प्रकारचा अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलचा फलकदेखील नसून, या वाहनाची कागदपत्रे पूर्ण नाहीत. वाहनदेखील मुदतबाह्य झालेले आहे. मात्र, या वाहनात प्रशिक्षण देण्यासाठी हवा असलेला बदलदेखील करण्यात आलेला आहे. इतके दिवस आरटीओच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर appeared first on पुढारी.