नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास…

जॅक्शन वधातील पिस्तूल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्शन’ची हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थेटरमध्ये गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला बुधवारी (दि.21) 113 वर्ष पूर्ण झाली. ज्या पिस्तूलाने हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्शनचा वध केला होता ते पिस्तूल सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे.

हा दुर्मिळ ठेवा नाशिककर नागरीकांसाठी दि. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत खुला करण्यात आला आहे. दुपारी ३ ते रात्री ८ वाजे पर्यंत नाशिककरांना हा पिस्तूल बघता येणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सावानाने हा निर्णय घेतला असून सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने नाशिककरांना हा पिस्तूल पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे यामागील इतिहास…. ?

अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जूलमी ब्रिटीश कलेक्टर जॅक्सन याची हत्या करण्याचे ठरविले होते. मात्र जॅक्सनची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने ते शक्य होणार नव्हते. नाशिक येथेच जॅक्शनला ठार करणे सोपे होते. मात्र जॅक्शनची मुंबई येथे बदली करण्यात आली त्यावेळेला नाशिकमधील विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी घ्यायचे ठरले. जॅक्शनला नाटकाची आवड होती, त्यामुळे तो हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून आला. त्याचवेळी कान्हेरे यांनी संधी साधत जॅक्सनवर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या. या घटनेत जॅक्सन हा जागीच ठार झाला. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटर मध्ये ही घटना घडली. कान्हेरे यांना याकामी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांचीही साथ मिळाली.

या घटनेनंतर कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे या तिघांवरही खटला चालवण्यात येवून त्यांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आली होती. याच घटनेला 113 वर्ष पूर्ण झाल्याने नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने या वधातील जतन करुन ठेवलेला पिस्तूल नाशिककरांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास... appeared first on पुढारी.