नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर

हुडहुडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरातून पावसाने निरोप घेतल्यानंतर थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राज्यात मंगळवारी (दि. 1) नाशिकमध्ये सर्वांत नीचांकी 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पार्‍यातील या घसरणीमुळे नोव्हेंबरच्या प्रारंभीच नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

गेल्या महिन्यात 25 तारखेच्या आसपास मान्सून परतल्यानंतर राज्याच्या तापमानात झपाट्याने बदल होत थंडीचा जोर वाढला आहे. त्यामध्येच राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वतरांगांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतासह महाराष्ट्रातील हवामानावर झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमानाच्या पार्‍यात लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्येही पार्‍यातील घसरण कायम आहे. पहाटे आणि रात्री थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभीच थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककर गारठले आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत असून, उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही थंडीचा जोर जाणवू लागला आहे.

निफाड, दिंडोरीतील द्राक्षबागांना या हवामानाचा फटका बसू शकतो. विशेष करून द्राक्ष फुगवणी आणि फळात साखर उतरण्याचा हा हंगाम असताना थंड वार्‍यांचा वेग वाढल्याने द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीचा मारा झेललेल्या शेतकर्‍यांपुढे आता नव्याने संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, उत्तर भारताकडून येणार्‍या शीतलहरींचा जोर येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकच्या पार्‍यात अधिक घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.

नाशिक शहराचे तापमान
तारीख अंश सेल्सिअस
21 ऑक्टोबर 22.0
22 ऑक्टोबर 21.4
23 ऑक्टोबर 15.0
24 ऑक्टोबर 14.2
25 ऑक्टोबर 13.4
26 ऑक्टोबर 14.6
27 ऑक्टोबर 14.0
28 ऑक्टोबर 15.3
29 ऑक्टोबर 13.6
30 ऑक्टोबर 13.3
31 ऑक्टोबर 13.6
1 नोव्हेंबर 12.6

हेही वाचा :

The post नाशिककरांना हुडहुडी, पारा 12.6 अंशांवर appeared first on पुढारी.