नाशिककरांनो काळजी घ्या! उपनगरमधील महिलेचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू

स्वाईन फ्लू रूग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपनगरमधील खासगी रुग्णालयात संबंधित महिला उपचार घेत होती. आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आरोग्य समितीने या मृत्यूची पुष्टी केली आहे. कोरोना महामारी आणि डेंग्यू या आजारांचे संकट सुरू असतानाच जुलै महिन्यापासून स्वाइन फ्लूचेही संकट उभे ठाकले आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत शहरात स्वाइन फ्लूच्या एकाही रुग्णाची नोंद मनपाकडे नव्हती. पावसाळा सुरू होताच जून महिन्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले. जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 28 पर्यंत गेली होती. 17 ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा 49 वर पोहोचला आहे. त्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी नोंदवला गेल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

उपनगरमधील 47 वर्षीय महिलेचा 29 जुलै 2022 रोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हास्तरीय आरोग्य समितीने संबंधित महिलेच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, या समितीने महिलेचा मृत्यू स्वाइन फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे.

2017 मध्ये नाशिक शहरात स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. 264 नागरिकांना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली होती. तर 32 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये 241 रुग्ण आढळून आले आणि 24 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2019 मध्ये 178 रुग्ण आढळून 11 जणांचा मृत्यू गेला होता. 2020 मध्ये 6 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. 2021 मध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही. यावेळी मात्र स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

The post नाशिककरांनो काळजी घ्या! उपनगरमधील महिलेचा 'स्वाइन फ्लू'ने मृत्यू appeared first on पुढारी.