नाशिककरांनो खबरदार… सिग्नल तोडल्यास मिळणार दंडाची पावती घरपोच

सिग्नल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बेशिस्त वाहनधारकांवर करडी नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ८०० पैकी ५० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वितदेखील केले असून, उर्वरित कॅमेरे मेअखेरपर्यंत कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही सिग्नल तोडण्याचा विचार करत असाल किंवा वाहतुकीचे नियम मोडत असाल, तर तुम्हाला घरबसल्या दंडाची पावती प्राप्त होणार आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरक्षितेसाठी वाहतूक नियोजन, अपघातातील वाहनांच्या शोधासाठी शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ४० प्रमुख चौकांसह ८०० पेक्षा अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही ठिकाणी वाय-फाय स्पॉटदेखील उभारले आहेत. स्मार्ट सिटीने कॅमेऱ्यांचे कंत्राट यूटीएसटी ग्लोबल कंपनीला दिले होते. याकरिता स्मार्ट सीटीकडून महाआयटीला १०० कोटींचा निधी देणार होती. यावरून बराच वादही निर्माण झाला होता. वादावर तोडगा काढण्यासाठी महाआयटी सीसीटीव्ही आणि आयटीसी एकत्रित निधी देण्याऐवजी टप्प्याटप्याने कामानुसार निधी देण्याची भूमिका स्मार्ट सिटीच्या संचालकांनी घेतली होती. दरम्यान, कॅमेरे बसविल्यानंतर ते कार्यान्वित आहेत की नाही? याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. वाहनधारकांमध्ये केवळ भीती निर्माण करण्यासाठी बंद कॅमेरे बसविण्यात आल्याचा शोधही अनेकांकडून लावला जात होता. दरम्यान, हे सर्व कॅमेरे सुस्थितीत असून, ते सुरू करण्यासाठीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

बीएसएनएल कंपनीच्या माध्यमातून हे कॅमेरे कार्यान्वित केले जात असून, मेअखेरपर्यंत सर्व कॅमेरे सुरू करण्याची जबाबदारी बीएसएनएल कंपनीवर सोपविण्यात आली आहे. सध्या ८०० पैकी ५० कॅमेरे सुरू करण्यात आल्याने, पोलिस त्यावरून बेशिस्त वाहनधारकांवर लक्ष ठेवून आहेत. विशेषत: बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा डोळा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ‘रियल टाइम व्हिडिओ रेकॉर्डिंग’ शक्य असल्याने वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीलाही पायबंद बसणार आहे.

मुख्य चौकात तिसरा डोळा

बहुतांशी मुख्य चौक, भागात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीबीएस, मेहेर सिग्नल, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल अशा विविध भागांत कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय शहरातील इतरही भागांत कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. या माध्यमातून दुचाकींसह विविध प्रकारच्या वाहनांची तसेच इतर अनेक प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या तिसऱ्या डोळ्यामुळे नागरिकांना शहरात बिनधास्त वावरता येणार आहे.

पोलिस आयुक्तालयात ‘कमांड ॲण्ड कंट्रोल’

शहर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कमांड ॲण्ड कंट्रोल प्रणाली उभारण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात या कमांड कंट्रोल रूमचा सर्वप्रथम प्रभावी वापर झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याला जमलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण सीसीटीव्हीद्वारे करून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता स्मार्ट सिटी उपक्रमात शहरभर कमांड कंट्रोल रूमद्वारे वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करण्याचे दीर्घकालीन नियोजन यशस्वी होणार काय याकडे लक्ष आहे.

गुन्हेगार हुडकण्यासाठी फायदेशीर

सीसीटीव्ही पाहून दंड आकारणे, गर्दीच्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था ऐनवेळी वळविणे यांसारख्या निर्णयाशिवाय गुन्हेगार हुडकून काढण्यासाठी पोलिसांना ही यंत्रणा फायदेशीर ठरणार. यासाठी पोलिसांकडून कुशल तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर काही वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीदेखील पोलिसांवरच असेल, अशीही माहिती समोर येत आहे.

बीएसएनएल कंपनीच्या माध्यमातून कॅमेरे कार्यान्वित करण्याचे काम सुरू असून, मेअखेरपर्यंत सर्व कॅमेरे सुरू केले जाणार आहे. सध्या ५० कॅमेरे कार्यान्वित केले असून, त्याबाबतची माहिती पोलिस प्रशासनास देण्यात आली आहे.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

हेही वाचा : 

The post नाशिककरांनो खबरदार... सिग्नल तोडल्यास मिळणार दंडाची पावती घरपोच appeared first on पुढारी.