नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ

मयूर गवारी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद परिसरातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील एलआयसी अधिकारी व लेखक असलेले डॉ. गोपाळ गवारी व डॉ. संगीता गवारी यांचा मुलगा मयूर गवारी याची प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे अणुसंशोधन शास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे. मयूरच्या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भारतामधून केवळ १७ मुलांची निवड कल्पक्कम अणुसंशोधन शास्त्रज्ञ म्हणून करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून एकमेव मयूर गवारीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतीही राखीव जागा नसताना म्हणजे जातीच्या राखीव जागेवर त्याची निवड न होता ती सर्वसाधारण जागेतून झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये त्याने परीक्षा दिली होती. त्यात त्याची टेक्निकल ऑफिसर (मेकॅनिकल) म्हणून निवड करण्यात आली आहे. मयूर हा नुकताच कल्पक्कम येथे रुजू झाला आहे. आजपर्यंत त्याचा एलआयसी ऑफिस, कामगार संघटना, आदिवासी संघटना, इंजिनिअर कॉलेज केटीएचएम यांनी गौरव केला आहे. त्याच्या यशात अभ्यासू वृत्ती, त्याचे शिक्षक, शैक्षणिक संस्था, समाज, आईवडील आणि पाडे, मखमलाबाद येथील ग्रामस्थ यांचे योगदान आहे. त्याच्या यशाबद्दल मखमलाबाद ग्रामस्थांसह वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे, मविप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, डॉ. जगन्नाथ तांदळे, दामोधर मानकर, वाळू काकड आदी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

देशसेवेच्या ध्यासातून नोकरीला रामराम
मयूरला समाजसेवेचीही आवड असून, बरोबरच्या विद्यार्थ्यांना एखादा विषय तो नीट समजून सांगतो. त्याने सुजन कूपन प्रा. लि. कंपनीत २ वर्षे नोकरी केली. परंतु देशासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे, या उद्दात्त हेतूने त्याने नोकरी सोडून दिली व प्रचंड अभ्यास व मेहनत करून शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

दहावीला ९५ टक्के गुण
मयूरचे पहिली ते चौथी शिक्षण आदर्श मराठी शाळा, नाशिकरोड पाचवी ते सातवीपर्यंत पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, नाशिकरोड, सातवी ते दहावी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखमलाबाद येथे झाले आहे. दहावीमध्ये त्याने ९५ टक्के मार्क, तर केटीएचएम कॉलेजमधून अकरावी व बारावीला ९० टक्के मार्क मिळविले आहेत. गणपतराव ठाकरे इंजिनिअर कॉलेजमधून मेकॅनिकलची पदवी, तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे एमटेक पूर्ण केले. चित्रकला या विषयात त्यास अनेक बक्षिसे मिळाली आहेत. बौद्धिक चर्चासत्रातही त्यास विशेष रस आहे.

हेही वाचा:

The post नाशिकचा मयूर बनला अणुसंशोधन शास्त्रज्ञ appeared first on पुढारी.