नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत

मिनी मंत्रालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे मुख्यालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेमध्ये ओव्हरफ्लो झालेले ड्रेनेज, उघड्या डीपी, उघड्यावर असलेल्या वायर्स, तारा, अद्ययावत नसलेली आगप्रतिरोधक यंत्रणा तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा, थुंकणारी माणसे यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मिनी मंत्रायल अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत.

जिल्हा प्रशासनात ग्रामविकासासाठी असलेल्या त्रिस्तरीय रचनेमधील सर्वांत मुख्य रचना म्हणजे जिल्हा परिषद होय. जनरल पोस्ट ऑफिस रस्त्यावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या आवारात दिवसाला शेकडो अभ्यागत काही ना काही कामे घेऊन येत असतात. जिल्हा परिषदेच्या आवारात त्यांचे स्वागत खराब झालेल्या ड्रेनेजने आणि त्याच्या दुर्गंधीने होत आहे. या आवारात पार्किंग व्यवस्था व्यवस्थित असल्याने तेवढाच काय तो सुरळीतपणा येत आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतींमध्ये बसविलेली आगप्रतिरोधक यंत्रणा बदललेली नसल्याने दुर्दैवाने काही घटना घडल्यास आपत्ती ओढावली जाईल. तसेच काही इमारतींमध्ये उघड्यावर असलेल्या वायरींची जाळे, तुटलेल्या जाळ्या यांमुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, जिल्हा परिषद प्रशासन या सर्व बाबींमध्ये लक्ष घालणार का? हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत appeared first on पुढारी.