नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी

अजित चव्हाण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याचे रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले अजित माधवराव चव्हाण या भाजपमधील सर्वात तरूण चेहऱ्याकडे पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चव्हाण यांची भाजप प्रदेश प्रवक्ते म्हणून निवड केली होती. या काळात चव्हाण यांनी पक्षाची बाजू भक्कम व ठामपणे मांडली. त्याशिवाय लेखन, सखोल वाचन, अभिनय यासोबतच पत्रकारिता हा सर्वात मोठा यूएसपी असल्याने समाजकारण व राजकारणाचा त्यांचा अनुभव मोठा आहे. प्रशासनातील अनेक दिग्गजांशी त्यांची जवळीक आहे. यामुळेच वर्षभराच्या आत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी चव्हाण यांच्या खांद्यावर टाकली आहे.

अजित चव्हाण हे मुळचे चाळीसगाव तालुक्यातील रांजणगावचे रहिवासी असून नाशिक तसेच मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे. चव्हाण यांनी सुमारे दीड दशक टीव्ही अँकर म्हणूनही कार्य केलेले आहे. सर्वांत तरूण चेहरा, हजरजबाबीपणा, समयसूचकता, अभ्यासू व आक्रमकबाणा याच स्वभाव गुणवैशिष्ट्यावर त्यांची पक्षाने ही सुनियोजित निवड केल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात पक्षाला त्यांच्या माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच फायदा होणार आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून महाराष्ट्रभरातून चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकच्या अजित चव्हाणांकडे भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी appeared first on पुढारी.