नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी ‘बजेट हॉटेल’ ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक पुढारी वृत्तसेवा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे.

पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट ३ स्टार व ४ स्टार हॉटेलच्या विकासासाठी १०० -१२५ खोल्यांसाठी योग्य जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहे. संचालक (वित्त) आयआरसीटीसी नवी दिल्ली यांनी सचिवांना याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यामध्ये नाशिक शहरात बजेट हॉटेलसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. नाशिकचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच आगामी कुंभमेळा लक्षात घेता, आयआरसीटीसीला नाशिकमध्ये बजेट हॉटेल्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून नाशिकची पर्यटन क्षमता वाढून अर्थकारणाला देखील अधिक गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.

त्यादृष्टीने पर्यटनासाठी अतिशय महत्वाचे शहर असलेल्या नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना दर्जेदार निवासाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आयआरसीटीसी या भारत सरकारच्या उपक्रमास बजेट हॉटेल तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी 'बजेट हॉटेल' ; भुजबळांचे मुख्य सचिवांना पत्र appeared first on पुढारी.