नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शवागाराची व्यवस्था आहे. मात्र, काही महिन्यांपासून शवागारातील शीतपेट्या नादुरुस्त असल्याने मृतदेहांची दुर्गंधी व पाणी शवागारासह परिसरात पसरत आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौफुलीवर खासगी बस व आयशर यांच्यात झालेल्या अपघातानंतर 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर एकाच वेळी 12 मृतदेह आल्यानंतर शवागाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनगृह व शवागार उभारण्यात आले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी तीन ओटे असून, शवागारात 54 शवपेट्या आहेत. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या पेट्या नादुरुस्त झाल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तात्पुरती दुरुस्ती होते, मात्र पुन्हा शवपेट्या नादुरुस्त होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमचा असून, त्यामुळे मृतदेह ठेेवण्यासाठी सुविधा उपलब्ध होत नाही. बेवारस मृतदेहांची ओळख न पटल्यास त्या मृतदेहांची दुर्गंधी पसरते व पाणी सुटते. त्यामुळे शवागारासह परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे चित्र कायमचे झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शवागारातील 54 पेट्या बंद पडल्या आहेत. शवपेट्यांचे कॉम्प्रेसर बंद पडले असून, मृतदेह ठेवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान स्थिर राहत नाही. पेट्यांचे दरवाजे नादुरुस्त आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शवविच्छेदनगृहासह शवागाराची क्षमता वाढवण्यासोबतच शवविच्छेदनगृहातील ओट्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

मंजुरी मिळाली नसल्याने शवागाराचा प्रश्न ‘जैसे थे’
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने नव्याने शवागार उभारण्यासाठी 52 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे. मात्र, अद्याप त्यास मंजुरी मिळाली नसल्याने शवागाराचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. त्याचप्रमाणे शवविच्छेदनगृहातील ओट्यांची संख्या तीनहून दहापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड appeared first on पुढारी.