नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी यांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं सुवर्णपदक

table tenis www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चेन्नईत सुरू असलेल्या यूटीटी 84 व्या ज्युनियर व यूथ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने हरियाणा संघाचा 3-1 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र संघाची कर्णधार असलेल्या नाशिकच्या तनिशा कोटेचा हिने दोन सेट व सायली वाणीने एक सेट जिंकून महाराष्ट्राला मुलींच्या संघाने सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

अंतिम फेरीत पहिल्या सेटमध्ये हरियाणाच्या सुहाना सैनीने महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीसचा 3-0 असा पराभव करून सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या सेटमध्ये तनिशा कोटेचाने हरियाणाच्या प्रितोकी चक्रवर्तीचा 3-0 पराभव करून सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. तिसर्‍या सेटमध्ये सायलीने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर हरियाणाच्या काव्या यादव हिचा 3-0 असा सहज पराभव करून संघाला सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात शेवटच्या सेटमध्ये तानिशाने सुरुवातीपासून सुहानाला डोके वर काढू न देता 11-4 असा जिंकला आणि संघाला जेतेपद मिळवून दिले. तानिशा व सायलीने हे विजेतेपद महाराष्ट्राला जिंकून दिल्याबद्दल त्यांचे प्रशिक्षक जय मोडक यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, क्रीडा संचालक सुहास दिवसे, शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, संजय वसंत, सतीश पटेल, जय मोडक, गणेश माळवे (परभणी), महेंद्र चिपळूणकर (मुंबई), योगेश देसाई (मुंबई, उपनगर), राम कोणकर (पुणे), भैया गरुड (धुळे), विवेक आळवणी (जळगाव), प्रकाश जसानी (गोंदिया) आदींनी यशस्वीतांचे कौतुक केले.

स्पर्धेचा निकाल याप्रमाणे…
1) जेनिफर वर्गीस पराभूत वि. वि. सुहाना सैनी        9-11, 2-11, 6-11.
2) तनिशा कोटेचा वि. वि. प्रोतिका चक्रवर्ती            11-7, 11-6, 14-12.
3) सायली वाणी वि. वि. काव्या यादव                    11-6, 11-3, 11-7.
4) तनिशा कोटेचा वि. वि. सुहाना सैनी                   7-11, 11-7, 11-9, 11-13, 11-4.

हेही वाचा:

The post नाशिकच्या तनिशा कोटेचा, सायली वाणी यांनी महाराष्ट्राला मिळवून दिलं सुवर्णपदक appeared first on पुढारी.