नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी

द्राक्ष

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा
द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या द्राक्षांची गोडी जगभरात पोहोचली असून, यंदाच्या हंगामात नाशिकमधून परदेशामध्ये 114 कंटेनरमधून 1 हजार 453 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. या द्राक्षांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जर्मनी, युकेसह नेदरलँड, रोमोनिया, स्वीडन अशा अनेक देशांना भुरळ घातली आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षांच्या नुकसानीनंतर शेतकर्‍यांना यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.

गत दोन वर्षे कोरोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती. त्यानंतर बदलत्या वातावरणामुळे द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, यंदा नुकसान कमी झाल्याने द्राक्षपीक चांगल्या स्थितीत आहे. यंदाच्या वर्षी थंडीचाही काही फारसा फटका बसलेला नाही. द्राक्षाची लागवडही यंदाच्या वर्षी अधिक होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार हे निश्चित होते. विशेष म्हणजे नेदरलँड, रोमोनिया, स्वीडन, जर्मनी आणि युके या ठिकाणी 1,453 मेट्रिक टन निर्यात अवघ्या वीस दिवसांत झाली आहे. जिल्ह्यातून 41 हजार 688 हजार द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. त्यामध्ये निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुका द्राक्षपीक घेण्यात अव्वल आहे. युरोपमधील नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, युके आणि डेन्मार्क येथे द्राक्ष पाठविले जातात. तर रशिया, यूएई, कॅनडा, तर्की या देशांमध्ये द्राक्षाची निर्यात होते.

परकीय चलन देणारे फळ: द्राक्ष हे परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. 2021-22 हंगामात तब्बल 2 लाख 63 हजार 75 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 2302 कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. केंद्राने बांगलादेशमध्ये निर्यातीसाठी लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली तर द्राक्ष निर्यातीस वाव मिळेल.

हेही वाचा:

The post नाशिकच्या द्राक्षांची जर्मनी, युकेला गोडी appeared first on पुढारी.