नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोेट क्षेत्रातही चांगला पाऊस बरसल्याने त्यांच्या साठ्यात वाढ होण्यास मदत मिळाली आहे. 24 प्रकल्पांमधील उपयुक्त साठा 52 हजार 470 दलघफूवर पोहोचला आहे. 2021 मध्ये याच काळात धरणांमध्ये अवघा 28 टक्के म्हणजेच 18,496 दलघफू साठा उपलब्ध होता. पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे यंदा जुलै मध्यातच धरणे काठोकाठ भरल्याने गेल्या काही वर्षांतील हा विक्रम ठरला आहे.

नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण 62 टक्के भरले असून, धरणात 3,497 दलघफू साठा निर्माण झाला आहे. मान्सूनचे अडीच महिने बाकी असून, या काळात पर्जन्यमानाचा अंदाज बघता धरणामधून सध्या 2,754 क्यूसेक विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या दारणाचा साठा 66 टक्के झाला असून, धरणातून 8846 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेले आणि जळगाव जिल्ह्याची तहान भागविणारे गिरणा धरण 92 टक्के भरल्याने त्यातून 2,476 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. हे धरण सलग चौथ्या वर्षी भरले आहे. दरम्यान, अन्यही प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरू आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली असली, तरी पुढील अडीच महिन्यांचा त्याचा प्रवास बघता, जिल्हावासीयांची पुढील वर्षापर्यंतची पाण्याची चिंता सरली आहे.

धरण समूहनिहाय साठा
धरण    समूह साठा (दलघफू)                टक्के
गंगापूर        7,279                              72
दारणा         14,209                            75
पालखेड       6,985                              84
ओझरखेड    3,092                              96
चणकापूर     19,917                            86
पूनद            627                                38

पाण्याचा विसर्ग (क्यूसेकमध्ये)
जिल्ह्यात सध्या 19 धरणांतून विसर्ग केला जातोय. गंगापूरमधून 2,754 व दारणातून 8,846 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय गौतमी 200, आळंदी 961, पालखेड 3,690, करंजवण 1,155, वाघाड 2,051, ओझरखेड 1,252, पुणेगाव 326, तिसगाव 214, भावली 701, वालदेवी 183, कडवा 1,294, भोजापूर 540, चणकापूर 2,068, हरणबारी 846, केळझर 388 व गिरणातून 2,476 क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून 32,822 क्यूसेक वेगाने जायकवाडीकडे पाणी झेपावते आहे. त्यामुळे जायकवाडी 66 टक्के भरले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.