Site icon

नाशिकच्या निफाडला अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान

निफाड; पुढारी वृत्तसेवा : ऐन होळीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसला. द्राक्ष, गहू , कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान आले आहे. तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडत राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल होऊन गेला आहे.

हवामान तज्ञांकडून 5 मार्चपासून 8 मार्च पर्यंत या संपूर्ण परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. सोमवारी (दि. ६) पहाटे दोन वाजल्यापासून निफाड परिसरात मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटाने वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे चार तास  कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतच राहिला. वारा आणि तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी कापणीला आलेल्या गव्हाचे पीक आडवे पडल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांचे विक्रीला आलेले द्राक्षाचे पीक देखील संकटात सापडले असून बागायतदारांची वर्षभराची मेहनत एका तडाख्यात नष्ट होण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाचा चटका बसून द्राक्षांची गुणवत्ता ढासळू नये यासाठी द्राक्ष घडाना खूप मोठा खर्च करून कागदाचे आवरण चढवावे लागते. लावलेला कागद पावसाच्या चार थेंबांमध्येच खराब होऊन जातो. त्यामुळे इतका प्रचंड खर्च करून लावलेला कागद आणि त्यासाठी केलेले श्रम तर वाया जाणार आहेतच शिवाय या द्राक्ष घडांना आता बुरशी, जीवाणूजन्य रोग आणि इतर गोष्टींचा सामना करावा लागून प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

The post नाशिकच्या निफाडला अवकाळी पावसाचा तडाखा; द्राक्ष, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Exit mobile version