नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ

पक्षप्रमुख भेट नाशिक शिवसेना,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आडून शिवसेना फोडू पाहणार्‍या भाजपला शिवसेनेने नाशिकमध्ये धक्का देत प्रवीण तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा वचपा अखेर काढला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका पूनम धनगर यांच्या शिवसेना प्रवेशासह नाशिकच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनिष्ठतेेची वज्रमूठ दाखवून दिली.

पूनम धनगर यांच्या प्रवेशामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आता भाजपवरही डॅमेज कंट्रोलची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर राजकारण जोरदार फिरू लागले आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथील शिवसेनेचे काही पदाधिकारी व नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेनेतून कोणी बाहेर पडेल, अशी शक्यता नव्हती. परंतु, तिदमे यांच्या रूपाने शिवसेनेला काहीसा धक्का बसला. भविष्यात होणारे बंड रोखण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी सेनेच्या सर्वच माजी नगरसेवकांच्या घरी भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला. तसेच नाशिकमधील शिवसैनिक आणि पदाधिकारी अजूनही एकसंध असून, पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) उद्धव ठाकरे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करून एकजूट दर्शविली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे आदींसह सर्व प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

इतरांना मोठे करणारे माझ्याबरोबर : ठाकरे

शिवसेनेने अनेक पदे, मान-सन्मान देऊन मोठे केलेल्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना मोठे करण्यात तुमच्या सर्वांचा वाटा आहे. त्यामुळे इतरांना मोठे करणारे जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कसलीच भीती नसल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिकांविषयी व्यक्त केली. सर्वसामान्य शिवसैनिक हाच शिवसेनेचा प्राण आहे. शिवसैनिकांची साथ आहे, तोपर्यंत शिवसेनेला कोणीच संपवू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेची कामे मनापासून आणि प्रामाणिकपणे करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. खरा शिवसैनिक एकनिष्ठ आहे. तो कधीही गद्दारी करणार नाही. सर्वांनी एकत्र राहा. जनमानसात शिवसेनेविषयी असलेली सहानुभूती आणखी वाढवा. सामान्य जनताच गद्दारांना धडा शिकवेल, तुम्ही त्याची चिंता करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

चुंभळे, साबळे यांची गैरहजेरी

मातोश्रीवर गेलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांपैकी श्यामकुमार साबळे, शिवाजी चुंभळे यांची गैरहजेरी होती. त्यामुळे हे दोन्ही नगरसेवक भाजप व शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. साबळे हे ना. दादा भुसे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे यांची अनुपस्थिती ही पदाधिकार्‍यांनीही ग्राह्यच धरली होती.

The post नाशिकच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुखांसमोर एकनिष्ठतेची वज्रमूठ appeared first on पुढारी.