नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड

हरिहर किल्ला नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वरुणराजाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्षा सहलींचे पेव फुटले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकर्ससह हौशी पर्यटकांची झुंबड उडाली होती. दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने 50-50 पर्यटकांना ‘स्लॉट’द्वारे किल्ल्यावर सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविताना वनविभागाच्या नाकीनऊ आल्याचे चित्र बघावयास मिळाले.

निसर्गाचे कोंदण लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. विशेषत: पावसाळ्यात पर्यटकांची पावले त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जव्हार घाट आदी परिसराकडे वळत असतात. हरिहर किल्ल्यावरही पर्यटकांची बाराही महिने मोठी वर्दळ असते. पावसाळ्यातील किल्ल्यावरील पर्यटकांची गर्दी नियंत्रणासाठी ई-प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय पश्चिम वनविभागाने घेतला आहे. मात्र, त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पर्यटकांना स्लॉटने पाठविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

‘वीकेण्ड’ला हरिहर किल्ल्यावर टप्प्याटप्प्याने पर्यटक पाठविण्यासाठी अरुंद पायर्‍या असलेल्या ठिकाणाच्या दोन्ही टोकांवर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते. गर्दीवर नियंत्रणासाठी किल्ल्यावरील पर्यटक खाली उतरल्यावर इतरांना वर सोडण्यात येत होते. मात्र, पर्यटकांची संख्या अधिक असल्याने वनविभागाचे नियोजन कोलमडले होते. भल्या पहाटेपासूनच हौशी पर्यटकांमुळे किल्ल्यावर प्रचंड गर्दी झाली होती.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असूनही पर्यटकांचाही लोंढा कायम राहण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी किल्ल्यावरील पर्यटनबंदी करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या त्र्यंबकेश्वरसह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच हरिहर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. स्थानिक संयुक्त व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन किल्ल्यावर पर्यटकांना सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.
– राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

The post नाशिकच्या हरिहर किल्ल्यावर ट्रेकर्ससह पर्यटकांची झुंबड appeared first on पुढारी.