नाशिकमधील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी

देवयानी फरांदे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात अमली पदार्थांची विक्री होत असून, हुक्का पार्लर, अवैध धंदेही सुरू आहेत. त्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत शासनाने दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर येत असून, भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप आ. फरांदे यांनी केला आहे. तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लरदेखील मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्याच्यावरदेखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली.

शहरातील मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूर रोडवर काही हॉटेल व कॅफे हे अमली पदार्थांचे अड्डे झाले आहेत. पानटपरीवर अमली पदार्थ मध्यरात्रीपर्यंत खुलेआम विकले जात आहेत, त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व्यसनाधीन होत असल्याची चिंता आ. फरांदे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मुंबई नाका परिसरात अवैध धंदे जोरात सुरू असून, त्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबाबत आ. फरांदे यांनी नाराजी व्यक्त करत शहरातील गुन्हेगारीचे प्रमाणदेखील वाढल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री व वाहतूक थांबविण्यासोबत तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करावी व अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी आ. फरांदे यांनी केली आहे.

The post नाशिकमधील अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार देवयानी फरांदे यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.