नाशिकमधील ‘या’ गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा

शपथविधी सोहळा,www.pudhari.news

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
अंजनेरीच्या लोकनियुक्त सरपंच जिजाबाई लांडे यांचा शपथविधी तब्बल दोन हजार ग्रामस्थांच्या साक्षीने आणि आमदार, खासदारांच्या उपस्थितीत झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, दिनकर पाटील, किरण चव्हाण यांसह अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. दोन हजार ग्रामस्थांसमोर लांडे आणि सहा सदस्यांनी गावाचा कारभार संविधानाला अनुसरून लोककल्याणासाठी करणार असल्याची जाहीर शपथ घेतली.

नुकत्याच झालेल्या अंजनेरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई लांडे लोकनियुक्त सरपंच म्हणून बहुमताने निवडल्या. त्यांचे पती मधुकर लांडे यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे आणि जिजाबाई यांनी साठी ओलांडलेली आहे.

जिजाबाई लांडे 25 वर्षांपूर्वी अंजनेरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या राहिल्या आहेत. त्यानंतर काही वर्षे अंजनेरीच्या सरपंच होत्या. स्वत: मधुकर लांडे अंजनेरीचे 15 वर्षे सरपंच होते. मात्र, मागच्या 10-12 वर्षांपासून ते अंजनेरीच्या राजकारणापासून दूर आहेत. यावेळेस त्यांनी आता शेवटची लढाई म्हणून लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जोर लावला.

ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाची परतफेड म्हणून आणि उतारवयात जिंकलेल्या निवडणुकीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी बालदिनाचे औचित्य साधत पत्नी जिजाबाई यांचा शपथविधी स्वखर्चाने आयोजित केला होता. व्यासपीठावर माजी पोलिस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले, ग्रेप काउंटीचे संचालक किरण चव्हाण, ब—ह्मा व्हॅली आणि सपकाळ महाविद्यालय यांचे प्राचार्य, मधुकर खांडबहाले आदी मान्यवर उपस्थित होते.

निधी देणार : खा. हेमंत गोडसे
खासदार गोडसे, आमदार खोसकर यांनी अंजनेरी गावच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे जाहीर आश्वासन सोहळ्याप्रसंगी दिले. मनपा नेते दिनकर पाटील यांनी सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. यावेळेस उपस्थित ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी अशा प्रकारे शपथविधी करून पारदर्शक कारभाराचा पायंडा पाडत असल्याचे म्हणत या उपक्रमाचे स्वागत केले.

हेही वाचा :

The post नाशिकमधील 'या' गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा appeared first on पुढारी.