नाशिकमधून तीन हजार शिवसैनिक अयोध्येत

नाशिकचे शिवसैनिक अयोध्येत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे रविवारी (दि. ९) अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधून शुक्रवारी (दि. ७) तब्बल तीन हजार शिवसैनिक अयोध्येकडे निघाले असून, शनिवारी (दि. ८) रात्री ते अयोध्येला पोहोचणार आहेत. 1200 हून अधिक शिवसैनिक विशेष रेल्वेने तर उर्वरित शिवसैनिक विमान तसेच खासगी वाहनांनी अयोध्येला निघाल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

शिवसेना हे पक्षनाम आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर त्याचा राज्यभर गजर करण्यासाठी तसेच हिंदुत्वाचा अजेंडा अधिक तीव्र पद्धतीने जनतेसमोर मांडण्यासाठी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार असून, श्रीरामाचे दर्शन व शरयू नदीतीरी आरती करून शुभारंभ करणार आहेत. त्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी नाशिकच्या विश्वासू शिलेदारांवर त्याबाबतची धुरा सोपविण्यात आली होती. यापूर्वीदेखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यांची धुरा नाशिकच्या शिलेदारांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर नाशिकमधून अधिकाधिक शिवसैनिकांना घेऊन जाण्याचे एकप्रकारचे आव्हानच शिंदे गटासमोर निर्माण झाले होते. संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे पथकच अयोध्येला शनिवारी रात्री दाखल होणार आहे.

शुक्रवारी (दि. ७) विशेष रेल्वेने शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले. खासदार हेमंत गोडसे यांनी भगवा ध्वज दाखविला. शिवसैनिकांना खास टी-शर्ट देण्यात आले होते. तालुका आणि विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांसाठी संपूर्ण रेल्वेच्या १८ बोगी आरक्षित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक शिवसैनिकाला ओळखपत्र देण्यात आले होते. सध्या कोरोना आणि साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिवसैनिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे एक पथकही सोबत नेण्यात आले. शुक्रवारी निघालेली रेल्वे शनिवारी (दि. ८) रात्री अयोध्येत दाखल होणार आहे. त्यानंतर रविवारी (दि. ९) श्रीराम दर्शन व शरयू नदीवर आरती करून दौऱ्याची सांगता करण्यात येणार आहे.

रेल्वेने 1200 हून अधिक शिवसैनिक, तर उर्वरित विमान तसेच खासगी वाहनांनी आयोध्येला निघाले आहेत. जवळपास तीन हजार शिवसैनिक नाशिकमधून आयोध्येला निघाले आहेत. जनसामान्यांची शिवसेना अयोध्या दौऱ्यानंतर प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने अधिकच तळपणार आहे.

– अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख

अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यापासून ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ’ अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. नाशिकमधून कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारच्या घोषणा देत अयोध्येकडे प्रस्थान केले. नाशिकमधील सर्व कार्यकर्ते शरयू नदीतीरी होणाऱ्या महाआरतीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमधून तीन हजार शिवसैनिक अयोध्येत appeared first on पुढारी.